

पुणे, ता. ६ ः विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली असताना महायुतीपुढे बंडखोरी रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यातच भाजपने या निवडणुकीसाठी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे निवडणुकीच्या प्रभारीपदाची धुरा सोपविली आहे, तर प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांची निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.
विधान परिषद निवडणुकीच्या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना, तर पुणे शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली आहे. शिक्षक मतदारसंघात शिवसेनेकडूनही मंगेश चिवटे यांनी अर्ज भरला आहे, तर उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीयसहायक प्रा. सचिन सानप यांनी पदवीधर निवडणुकीसाठी अपक्ष अर्ज भरला आहे. त्यामुळे हे दोन्ही अर्ज कायम राहिल्यास भाजपची डोकेदुखी वाढणार असून, ही उमेदवारी मागे घेण्यासाठीचे आव्हान भाजपसमोर आहे.
यापूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपचा दारुण पराभव झाला होता. याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी भाजपने पक्षाची ताकद वाढवण्यासाठी निवडणूक समिती गठित केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्याकडे ‘प्रभारी’ पदाची जबाबदारी आहे. त्यांना मदत करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्याकडे ‘सह-प्रभारी’ पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांची ‘निवडणूक प्रमुख’, तर शरद लाड आणि शिक्षक प्रकोष्ठचे संयोजक डॉ. प्रशम कोल्हे या दोघांकडे सहनिवडणूक प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.