Pune : भुयारी मार्गात विद्युत दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवा काळेबोराटेनगर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

HADAPSAR

Pune : भुयारी मार्गात विद्युत दिवे, सीसीटीव्ही कॅमेरे बसवा काळेबोराटेनगर

उंड्री : काळेबोराटेनगर आणि सय्यदनगर भुयारी मार्गामध्ये रात्री-अपरात्री अंधारामध्ये लुटमारीच्या घटना वाढत असल्याने नोकरदार, महिलांमध्ये भीतीचे वातावरण झाले आहे. पालिका प्रशासनाने पथदिवे आणि पोलीस यंत्रणे गस्त वाढवून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करून आधार द्यावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांनी केली आहे.

महंमदवाडी, उंड्री, पिसोळी, हांडेवाडीकडे जाण्यासाठी काळेबोराटेनगर तर हडपसरकडे येण्यासाठी सय्यदनगर भुयारी मार्ग केला आहे. मात्र, त्या ठिकाणी विद्युत दिवे नसल्याने अंधारामध्ये समोरून येणाऱ्या वाहनांच्या प्रखर विद्युत दिव्यांमुळे अपघात होत आहेत. ज्येष्ठ नागरिक, महिला, कामगारांना अडवून लूटमारी केली जात असल्याचे अर्जुन सातव, विक्रम आल्हाट, श्याम शिंदे यांनी सांगितले.

काळेबोराडेनगर रेल्वे गेटपासून भुयारीमार्गातून हांडेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे नसल्याने रात्रीच्या वेळी अंधार असतो. भुयारी मार्गाच्या दोन्ही बाजूला रेडियम बसवावेत. पथदिवे आणि सीसीटीव्ही बसवून, रात्रीच्या वेळी दोन तासाच्या अंतराने पोलीस गस्त असावी.

-सोपान घोगरे, काळेबोराटेनगर

हांडेवाडी रस्ता परिसरात गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये घरकामासाठी आलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. रात्री-अपरात्री एकट्या कामगाराला अडवून लुटमारीचे प्रकार होत आहेत. त्यामुळे शाळा-महाविद्यालयातील मुलींमध्ये घबराटीचे वातावरण झाले आहे. प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्त वाढवावी, सीसीटीव्ही कॅमेरे आणि पथदिवे बसवावेत.

-प्रा. शोभा लगड, सीगल सोसायटी, हांडेवाडी रस्ता

काळेबोराटेनगर आणि ससाणेनगर भुयारी मार्गावर पथदिवे बसविले आहेत. काही ठिकाणी बसविण्याचे काम सुरू आहे. त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी मुख्य खात्याकडे पाठपुरावा सुरू आहे.

-प्रसाद काटकर, महापालिका सहायक आयुक्त, हडपसर

दरम्यान, वानवडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड म्हणाले की, नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस गस्त सुरू आहे. त्यामध्ये आणखी वाढ केली जाईल.