Pune : उदयोन्मुख व्यवसायांना पुढील तंत्रज्ञानासाठी तयार केले पाहिजे : देवदत्त देशपांडे Pune Emerging businesses prepare technology Devdutt Deshpande | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : उदयोन्मुख व्यवसायांना पुढील तंत्रज्ञानासाठी तयार केले पाहिजे : देवदत्त देशपांडे

Pune : उदयोन्मुख व्यवसायांना पुढील तंत्रज्ञानासाठी तयार केले पाहिजे : देवदत्त देशपांडे

पुणे : ‘‘व्यवसाय पुढील स्तरावर नेण्यासाठी महाटेक हा सर्व एसएमईसाठी महत्त्वाचा आहे. या माध्यमातून व्यवसायिकांना त्यांच्या व्यवसायिकांची व्याप्ती वाढविण्यास मदत होणार आहे. त्यामुळे उदयोन्मुख व्यवसायांना पुढील तंत्रज्ञानासाठी तयार केले पाहिजे,’’ असे मत ‘थरमॅक्स बायोएनर्जी सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड’चे मुख्य कार्यकारी अधिकारी देवदत्त देशपांडे यांनी व्यक्त केले.

‘महाटेक’ या औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन सिंचननगर येथे करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. ‘रौनक स्वीचगिअर ॲण्ड ऑटोमेशन’चे संचालक केतन दोडिया, ‘अल्फालॉजिक इंडस्ट्रीज लिमिटेड’चे संचालक वेदांत गोयल, मोंन्टी गांधी, ‘महाराष्ट्र इंडस्ट्रीज डायरेक्ट्ररी’चे व्यवस्थापकीय संचालक विनय मराठे, जनरल मॅनेजर सुधारक थट्टे आणि संचालक सुमुख मराठे यावेळी उपस्थित होते.

‘महाटेक’च्या या चार दिवसीय औद्योगिक प्रदर्शनामध्ये अत्याधुनिक उत्पादने, यंत्रे व उपकरणे मांडण्यात आली आहेत. हे प्रदर्शन मशिन टूल्स, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन व ऑटोमेशन इक्विपमेंट्स, फार्मा आणि सपोर्टिंग इंडस्ट्रीज मधील कॉर्पोरेट्स, लघु व मध्यम उद्योगांसाठी आयोजित करण्यात आले आहे.

चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन, ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन, गोवळीस इंडस्ट्रीज असोसिएशन, गोकूळ शिरगाव इंडस्ट्रीज असोसिएशन, असोसिएशन ऑफ इंडस्ट्रीज यांच्या सहयोगाने हे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. वेंडर डेव्हलपमेंट मीट, एनएसआयसी परिषद आणि डिजिटल मार्केटिंग परिषद पुढील तीन दिवसांत पार पडणार आहे.

दोडिया म्हणाले, ‘‘ महाटेक हे लक्ष्य साध्य करण्यासाठी महत्त्वाचे फ्लॅटफॉर्म आहे. यातून व्यवसायिकांना मार्गदर्शन मिळाले आहे. तसेच नवीन पिढी कशी तयार करायची हे प्रदर्शनाच्या माध्यमातून शिकता आले.’’ प्रास्ताविक विनय मराठे यांनी केले. त्यांनी प्रदर्शनामागील भूमिका मांडली. सूत्रसंचालन राजेंद्र पाटणकर यांनी केले. आभार सुमुख मराठे यांनी मानले.

‘महाटेक’ प्रदर्शनाबद्दल :

कुठे : कृषी महाविद्यालय पटांगण (नवीन), सिंचननगर

कधी : १२ फेब्रुवारीपर्यंत

वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ६

प्रवेश : सर्वांसाठी मोफत