Pune : अतिक्रमणांमुळे वाहनचालक-पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रीराम चौक

Pune : अतिक्रमणांमुळे वाहनचालक-पादचाऱ्यांचा जीव मेटाकुटीस

उंड्री : सय्यदनगर रेल्वे गेट क्र.७- श्रीराम चौक आणि वाडकर मळा दरम्यान ररस्त्यावर एकेरी वाहतूक केली आहे. मात्र, विरुद्ध दिशेने सर्रास वाहने धावत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. भाजी-फळ विक्रेत्यांबरोबर फेरीवाले, दुकानदारांचे अतिक्रमणांमुळे वाहतूककोंडीमुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत, ज्येष्ठ नागरिक, महिला-मुलांना जीव मुठीत धरून ये-जा करावी लागत आहे. पालिका प्रशासनाने अतिक्रमणे हटवावीत आणि विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांनी केली आहे.

सय्यदनगर गेट क्र.७जवळ माध्यमिक विद्यालय आहे. त्यामुळे विद्यालय सुरू आणि सुटण्याच्या वेळी वाहतूक कोंडी होत असल्याने मुलांचा गोंधळ उडतो आणि वाहनचालकांची तारांबळ होत आहे. अनेकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जाते. मात्र, इतरांकडे बोट दाखवून पोलिसांशी हुज्जत घालण्याचे अनेकांकडून केले जात आहे. पालिका आणि वाहतूक प्रशासनाकडून कडक उपाययोजना करावी, अशी मागणी मीना थोरात, काळुराम राऊत, सुजीत वाडकर, संतोष भंडारी, सागर वैद्य, शिवाजी शेवाळे, संजय शेटे, शबाना इनामदार यांनी केली.

सय्यदनगर-हांडेवाडी रस्त्यावर भाजी मंडई असूनही अनेक भाजी, फळविक्रेते रस्त्यावर ठाण मांडून असतात. दुकानदारांनीही फ्रंटमार्जिनवर अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला आहे, त्यामुळे पालिका प्रशासनाने कडक कारवाईचे धोरण अवलंबिले पाहिजे.

नाझीम शेख, चिंतामणीनगर

राज्य-परराज्यातील नोकरदार, कामगारांबरोबर, शाळा-कॉलेजमधील मुलांना वेळेत पोहोचण्याची घाई असते. अरुंद रस्ता आणि वाहनांची गर्दीमुळे वाहतूककोंडी होते. पालिका प्रशासनाने अतिक्रमणे हटवावीत, तसेच वाहनचालकांनी एकेरी मार्गावर विरुद्ध दिशेने वाहने दामटून जीव धोक्यात घालू नये.

-नाझीया तांबोळी, सय्यदनगर

वाहतूक सुरळीत करण्याबरोबर वाहनचालकांमध्ये नियमांचे पालन करण्याविषयी प्रबोधन केले जात आहे. त्याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. पालिका प्रशासनाबरोबर प्रत्येकाने सहकार्याची भूमिका ठेवली पाहिजे.

-बालाजी साळुंखे, सहायक पोलीस निरीक्षक, हांडेवाडी वाहतूक शाखा

वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या फळ-भाजीपाला विक्रेते आणि दुकानदारांच्या फ्रंटमार्जिवरही कारवाई केली जाते. नागरिकांच्या तक्रारीनुसार अतिक्रमणकडून पुन्हा कडक कारवाई करण्यात येईल.