
पुणे : पाषाण येथील वृक्षतोडीला पर्यावरणप्रेमींचा विरोध
औंध: पाषाण येथील सूसरस्त्यावरील साई चौकाजवळ असलेल्या मनपाच्या सार्वजनिक खेळाचे मैदानाजलळ असलेल्या झाडे तोडण्यात आली यास स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींनी मानवी साखळी करुन विरोध दर्शवला.याठिकाणी नागरिक सकाळ, संध्याकाळ फिरायला येतात तसेच सूसरस्ता, पाषाण, सुतारवाडी परिसरातील बरीच मुले इथे रोज खेळायला येतात.परंतु काल अचानक वृक्षतोड होताना आजूबाजूच्या सोसायटीतील नागरिकांना दिसून आले.हि वृक्षतोड कशासाठी व कोण करते याची परवानगी आहे का? अशी विचारणा पाषाण एरियासभेकडून मनपाला करण्यात आली तेव्हा प्रशासनाला याची काहीच कल्पना नसल्याचे सांगण्यात आले.तसेच हि वृक्षतोड मनपा करत नसून अशाप्रकारे आम्ही झाडे तोडण्यासाठी परवानगी दिली नसल्याचे सांगण्यात आले.याविषयी जागरुक नागरिकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन झाडे तोडणाऱ्यांना विचारणा असता, 'याची परवानगी असून आम्ही कंत्राटदाराची माणसे आहोत आम्हाला जास्त माहीती नसल्याचे वृक्षतोड करणाऱ्यांनी सांगितले.
दोन उंबराची व एक मोठे पिंपळाचे झाड पूर्ण छाटण्यात आले असून त्यापैकी दोन झाडावर ३० नोव्हेंबर २०१७ ची १३ झाडांसंबंधी जीर्ण झालेली नोटीस दिसून आली. त्यात दोन झाडे पूर्ण कापणे व ११ झाडांचे पुनररोपन करणे असे लिहिले होते. नागरिकांनी उद्यान विभागाचे अशोक घोरपडे यांच्याशी संपर्क करून हा प्रकार लक्षात आणून दिला असता 'एवढी जुनी परवानगी झाडे तोडण्यासाठी चालत नाही.तसेच ही वृक्षतोड अवैध असून आम्ही तपास करून संबंधितांविरुद्ध कारवाही करू' असे सांगितले.नागरिकांनी पोलीस कक्षाला या अवैध वृक्षतोडीबद्दल कळवले असता पोलीस येण्याआधीच झाडे तोडणारे पसार झाले होते.या घटनेला विरोध व संबंधितावर कारवाई करण्यात यावी यासाठी आज सकाळी ७ वाजता आजूबाजूच्या सूसरस्ता परिसरातील जवळपास पंचवीस सोसायट्यांमधील शंभर नागरिकांनी मैदानात झाडांजवळ मानवी साखळी करुन निषेध नोंदवला. जागतिक तापमानवाढ, बदलते वातावरण आणि त्याचा आरोग्यावर होणारा दुष्परिणाम स्पष्ट दिसत असताना गरज नसताना वृक्षतोडीचा हव्यास का? असा संतप्त सवाल करत आम्ही वृक्षतोड होऊ देणार नाही व सतर्क राहून गरज पडल्यास हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरून परिसरातील हिरवळ व सार्वजनिक मैदान वाचवू अशी भूमिका जमलेल्या नागरीकांनी घेतली.
Web Title: Pune Environmentalists Tree Felling Pashan
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..