आला पावसाळा : पुण्यात नालेसफाईचे आव्हान; फक्त 25% कामे पूर्ण

अविनाश पोफळे
मंगळवार, 23 मे 2017

तीनही प्रभागात नालेसफाईची कामे सुरू आहेत. आतापर्यंत 25 टक्के काम पूर्ण झाले असून, 75 टक्के बाकी आहे. नाल्यातील मोठे ब्लॉक काढणे, चॅनल साफ करणे आदी महत्त्वाच्या कामांना प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे. प्रभाग अधिकाऱ्यांना कामे पूर्ण करण्यासाठी 31 मेची मुदत दिली आहे. 
- राजेश फटाले, समन्वयक, नालेसफाई विभाग 

कर्वेनगर : पावसाळा तोंडावर आला, तरी वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गतच्या प्रभाग क्रमांक 13, 31, आणि 32 मध्ये नालेसफाईची केवळ 25 टक्के कामे पूर्ण झाली आहेत. ही कामे सुरू करण्यास उशीर झाल्याने महापालिका प्रशासनावर चौफेर टीका होत आहे. त्यामुळे आता वेळेत कामे पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. 
पावसाळ्यात पाणी साठणारी अनेक ठिकाणे या भागात आहेत. त्या ठिकाणी पाणी साचून जनजीवन विस्कळित होण्याचा प्रकार घडला, तर त्यास महापालिका प्रशासन जबाबदार राहील. नालेसफाईच्या कामाचे टेंडर देण्यास उशीर केल्याने ही कामे सुरू करण्यास उशीर झाला आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे. 

"महापालिकेकडून नालेसफाईच्या कामाचे मुल्यांकन (डीएसआर) पूर्ण झालेले नाही. भांडवली बजेटची कामे सुरू झालेली नाहीत. नेहमीच्या देखभाल-दुरूस्तीसाठीच्या तरतुदीअंतर्गत नालेसफाईसाठी प्रत्येक प्रभागाला पाच लाख रुपये दिले आहेत. त्याअंतर्गतच ही कामे सुरू आहेत,'' असे नालेसफाई कामाचे समन्वयक राजेश फटाले यांनी सांगितले. 

नगरसेवक सुशील मेंगडे म्हणाले," ठेकेदारांना नालेसफाईची कामे उशिरा मिळाल्याने ती सुरू होण्यास उशीर झाला आहे. नाले अजून साफ झाले नाहीत. ही कामे लवकर पूर्ण करावीत.'' 
भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले,"महापालिकेने नालेसफाईची कामे वेळेत पूर्ण करणे गरजेचे आहे. परिसरात पावसाळ्यात पाणी साठण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. त्यांची नीट सफाई न झाल्यास त्याचे परिणाम नागरिकांना भोगावे लागतील. पावसाळ्यात पाणी तुंबून काही प्रश्‍न निर्माण झाला, तर त्यास पूर्णपणे प्रशासन जबाबदार राहील.'' 
"नालेसफाईसाठी उशीर झाला असला, तरी महापालिका प्रशासनाकडून ती कामे पूर्ण करून घेण्यात येतील,'' असे नगरसेवक राजेश बराटे यांनी सांगितले. 

Web Title: pune faces nala, drain cleaning challenge in monsoon