पुणे : 500 हून अधिक शेतकऱ्यांना 23 कोटीचा गंडा; एकास अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Fraud

पुणे : 500 हून अधिक शेतकऱ्यांना 23 कोटीचा गंडा; एकास अटक

पुणे - शेतात शतावरी, अश्‍वगंधा यांसारख्या औषधी वनस्पतींची लागवड करून त्या विकत घेण्याचे आमिष दाखवून एकाने शेतकऱ्यांना तब्बल 23 कोटी 45 लाख रुपयांना गंडा घातल्याची माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने एकास अटक केली आहे. त्याने पुणे, सोलापुर, रायगडसह अन्य जिल्ह्यातील पाचशेहून शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे.

ऋषिकेश लक्ष्मण पाटणकर (वय 38, रा. आकाशदीप सोसायटी, धायरी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी राहुल शहा (वय 46, रा. जयराज किरण सोसायटी, वाळवेकरनगर) यांनी सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पाटणकरविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदाराचे हितसंबंधाचे संरक्षण कायद्यानुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश पाटणकर याने तीन वर्षांपूर्वी शुन्य हर्बल अग्रो डेव्हलपमेट नावाची कंपनी स्थापन केली. त्याने अनेक शेतकरी व गुंतवणुकदारांना शतावरी, अश्वगंधा या औषधी वनस्पतींची शेतात लागवड करण्यास सांगितले. येणारे पीक तो स्वतः खरेदी करून दरवर्षी एकरी तीन लाख रुपये देण्याचे आमिष दाखविले. त्यासाठी त्याने त्याच्या कंपनीकडे एकरी 50 हजार रुपये गुंतवून सांगितले. त्यामध्ये तो औषधी वनस्पतींचे रोप पुरवठा करून त्यांची लागवड करणे, त्यावर देखरेख, खते देणार आणि एक वर्षांनी कंपनी संबंधीत पीक जागेवरज विकत घेऊन पैसे देणार अशा स्वरुपाचे आश्‍वासन त्याने दिले.

हेही वाचा: मालक म्हणाले, "तुम्ही सगळे लवकर बाहेर पळा मी आलोच"; पण ते आले नाहीत

विशेषतः त्याने केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाचाही संदर्भ दिल्याने पुणे, रायगड, सोलापूरसह अन्य जिल्ह्यातील शेतकरी व नागरीकांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवून त्याच्याकडे गुंतवणूक केली. दरम्यान, 18 महिने उलटल्यानंतरही त्याने शेतकऱ्यांना नफा दिला नाही. तसेच मालही नेला नाही. मागील दोन वर्षांपासून शेतकरी त्याच्या कार्यालयात जात होते.तेथेही त्यांना प्रतिसाद मिळत नव्हता. अखेर शेतकऱ्यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन हा प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करून पाटणकर यास अटक केली. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सहाणे करीत आहेत.

loading image
go to top