esakal | पुणे : शोभेची दारू बनविणाऱ्या कंपनीला आग; एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

Fire

पुणे : शोभेची दारू बनविणाऱ्या कंपनीला आग; एका व्यक्तीचा होरपळून मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा परिसरात असलेल्या औद्योगिक वसाहतीतील भाऊ इंडस्ट्रीयल इस्टेट मधील केकवरील शोभेची दारू बनविणाऱ्या बालाजी इंडस्ट्रीज या कंपनीला लागलेल्या आगीत होरपळून एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून एक पुरुष व दोन महिला जखमी झाल्या आहेत. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मृत व्यक्तीचे शरीर पूर्णपणे जळाले असल्याने डीएनए चाचणीनंतर मृतदेहाची ओळख पटेल असे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले, मात्र कंपनीत काम करत असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी मृत व्यक्ती हे कंपनीचे मालक प्रविण उर्फ दत्तानंद दिगंबर बेंद्रे असल्याचे सांगितले आहे. विनायक गौरीशंकर कोकटणूर व रमा शरणप्पा गायकवाड यांनी जीव वाचविण्यासाठी पंधरा ते वीस फूट उंचीवरून उडी मारल्याने त्यांचा प्रत्येकी डावा पाय मोडला आहे तर मिनाक्षी अमोल सोनवणे या महिलेनेही उडी मारली मात्र तिला किरकोळ इजा झाली आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने चौदा महिला वेळीच बाहेर पळाल्याने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.आग लागली त्यावेळी एकूण अठरा कामगार कंपनीत काम करत होते.

हेही वाचा: शिरूर तालुक्याची पाण्याची चिंता मिटली, भामा आसखेड धरण शंभरी जवळ

प्रत्यक्षदर्शी कंपनीत काम करणाऱ्या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीचे मालक दत्तानंद बेंद्रे यांनी ज्वलनशील पावडर बॅरल मधून बाहेर काढताच अचानक स्फोट झाला. आगीचा भडका उडालेला पाहून सर्वजन बाहेर पळाले. तिघांनी वरुनच उड्या मारल्या. दुर्दैवाने एका व्यक्तीला पळता आले नाही त्यामुळे त्याचा आगीत होरपळून मृत्यू झाला.

दरम्यान आगीची माहिती मिळताच पीएमआरडीएचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे, अग्निशमन केंद्र प्रमुख सुजित पाटील,अतुल रोकडे, सोन्याबापू नांगरे, विशाल घोडे, शुभम मिरगुंडे, पंकज माळी, किशोर काळभोर, श्रीमंत आढाव, शुभम माळी, अक्षय तांबे, सुरज इंगवले, ओंकार इंगवले, अभिषेक गोणे पुणे महानगरपालिका अग्निशमन दलाचे गणेश भंडारी, प्रसाद कदम, पंकज इंगवले, राहुल मालुसरे, श्रीकांत वाघमोडे, तुषार पवार, प्रभारी अधिकारी सुभाष जाधव यांनी आठ बंबांच्या साहाय्याने तीन तासांच्या प्रयत्नानंतर आगिवर नियंत्रण मिळवले. घटनास्थळी पुणे ग्रामीण पोलीस दलाचे अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी सई भोरे-पाटील, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन नम, निरंजन रणवरे व सर्व पोलीस कर्मचारी दाखल झाले होते.

एकाही कंपनीला 'फायर एनओसी' नाही

नांदेड गावातील औद्योगिक वसाहतीत सुमारे सातशे पन्नास लहान-मोठ्या कंपन्या आहेत. धक्कादायक म्हणजे एकाही कंपनीने अग्निशमन विभागाकडून एनओसी घेतली नसल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. या औद्योगिक वसाहतीत आगीच्या घटना वारंवार घडत असताना व त्यामध्ये नागरिकांना जीव गमवावा लागत असताना या कंपनी चालकांवर अशा निष्काळजीपणाबाबत प्रशासन का कारवाई करत नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

loading image
go to top