Pune: प्रथमच उलगडले विश्वातील रहस्यमय ‘ग्रहण’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रथमच उलगडले विश्वातील रहस्यमय ‘ग्रहण’
प्रथमच उलगडले विश्वातील रहस्यमय ‘ग्रहण’

प्रथमच उलगडले विश्वातील रहस्यमय ‘ग्रहण’

पुणे : चंद्र आणि सूर्याला लागलेली ग्रहणे आपण नक्की पाहिली असतील. खगोलीयदृष्ट्या अशा ग्रहणांचे विशेष महत्त्व आहे. पण, विश्वातील सर्वात अचूक घड्याळ समजल्या जाणाऱ्या पल्सार ताऱ्याचे ग्रहण आजवर टिपता आले नव्हते. मात्र, भारतीय शास्त्रज्ञांनी अद्ययावत जीएमआरटीच्या साहाय्याने हे शक्य केले आहे. विश्वाच्या निर्मितीच्या संकल्पनेशी निगडित महत्त्वपूर्ण संशोधन हा आढावा...

कशाचा शोध लागला?

पृथ्वीपासून १३ हजार प्रकाशवर्षे अंतरावर J१५४४+४९३७ नावाचा एक न्यूट्रॉन तारा आहे. या ताऱ्या जवळच एक दूसरा सामान्य तारा आढळतो. अद्ययावत जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप (युजीएमआरटी) या रेडिओ दुर्बिणीच्या साहाय्याने प्रथमच या वैशिष्ट्यपूर्ण ताऱ्यांमधील ग्रहण टिपले आहे. न्यूट्रॉन ताऱ्यातून बाहेर पडणाऱ्या शक्तीशाली किरणोत्सर्गाच्या छायेत सामान्य तारा आल्यामुळे ही ग्रहणासारखी स्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा: T20 WC ENG vs NZ : इंग्लंडच्या पदरी झिरो; न्यूझीलंड ठरला हिरो

संशोधन महत्त्वाचे का?
मिलीसेकंद पल्सार (एका सेकंदाला एक हजारवेळा स्वतःभोवती फिरणारा) ताऱ्यामधील ग्रहणांबद्दल १९८०च्या दशकापासून शास्त्रज्ञांना माहीत होते. मात्र, त्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नव्हते. पल्सारमधील ऊर्जावान किरणोत्सर्गामुळे साथीदार ताऱ्यातील सामग्री कमी होऊन उडून जाऊ शकते. ही पसरलेली सामग्री पल्सारद्वारे उत्सर्जित होणाऱ्या रेडिओ पल्सला ग्रहण लावू शकते. विशेष म्हणजे, ग्रहण गुणधर्म रेडिओ पल्सच्या वारंवारतेवर अवलंबून असतात. कमी रेडिओ फ्रिक्वेन्सी पल्सारला ग्रहण लागतं, तर उच्च रेडिओ फ्रिक्वेन्सी पल्सारला ग्रहण लागत नाही. हे नेमके कोणत्या यंत्रणेद्वारे होते, हे यापूर्वी प्रस्थापित झालेले नाही. ते या संशोधनामुळे शक्य होत आहे.

संशोधनाचे वैशिष्ट्ये ः
- प्रथमच अधिकाधिक वारंवारीतेच्या (३०० ते ८५० मेगाहर्ट्झ) रेडिओ लहरींच्या वापरातून ग्रहणाची प्रक्रिया टिपली आहे.
- ग्रहण रेडिओ लहरींच्या वारंवारीतेवर कसे अवलंबून आहे. हे निरीक्षणांमुळे मोजणे शक्य झाले.
- मागील अंदाजापेक्षा २० पट अधिक अचूकतेने निरीक्षणे मांडली.
- पल्सार ताऱ्यातील किरणोत्सर्गाचा साथीदार ताऱ्यावर होणार परिणाम अभ्यासता आला

हेही वाचा: पेट्रोल-डिझेल वर चालणाऱ्या गाड्यांचे उत्पादन बंद करणार 'या' कंपन्या

कोणी केले संशोधन?
पुणे स्थिती राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्राचे (एनसीआरए) संशोधक विद्यार्थी
देवज्योती कंसबनिक यांनी डॉ. भास्वती भट्टाचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन केले. एनसीआरएचे डॉ. जयंता रॉय आणि जॉड्रेल बँक सेंटर फॉर अॅस्ट्रोफिजिक्स, द युनिव्हर्सिटी ऑफ मँचेस्टर मधील प्रा. बेंजामिन स्टॅपर्स यांचाही यात सहभाग आहे. अॅस्ट्रोफिजिकल जर्नलमध्ये नुकतेच हे संशोधन प्रकाशित झाले.
(पल्सार तारा ः प्रचंड घनतेचे मृत तारे, सर्व पल्सार चुंबकीय न्यूट्रॉन तारे असतात, जे विद्युतचुंबकीय प्रारण उत्सर्जित करतात.)

loading image
go to top