esakal | Pune : गदिमांच्या स्मारकाला मूर्त स्वरूप; प्रारंभिक कामांना सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

Gadima Monument

गदिमांच्या स्मारकाला मूर्त स्वरूप; प्रारंभिक कामांना सुरुवात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - गेल्या ४० वर्षांपासून फक्त कागदावर आणि निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये असलेला महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मीकी  ग. दि. माडगूळकर यांच्या स्मारकाचा विषय २०१७ नंतर महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा करीत धसास नेला आहे. मार्च २०२१ मध्ये कोथरूडमधील प्रस्तावित जागेवर स्मारकाचे भूमिपूजन पार पडले असून, प्रारंभिक कामांना सुरुवात झाली आहे. या प्रकल्पासाठी महापालिकेने एक कोटी रुपयांची तरतूदही केली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी २०१८ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष असताना ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने गदिमा स्मारकासाठीची जागा निश्चित करण्यासंदर्भात घोषणा केली होती. गेल्या डिसेंबरमध्ये सामारकासाठीची जागा निश्चित केली. त्यानंतर माडगूळकर कुटुंबीयांनी दिलेल्या सूचनांनुसार स्मारकाच्या आराखड्याचे काम सुरू झाले. तथापि, कोरोनाच्या अनपेक्षित संकटामुळे भूमिपूजनाचा कार्यक्रम नियोजित वेळेत होऊ शकला नाही. अखेर मार्च २०२१ मध्ये माडगूळकर कुटुंबीयांसह २५ जणांच्या उपस्थितीत भूमिपूजन पार पडले.

गदिमांचे दीर्घकाळ वास्तव्य पुण्यात होते. वाकडेवाडी येथील ‘पंचवटी’ बंगल्यातच त्यांच्या अनेक चित्रपटांच्या कथा आकाराला आल्या. अजरामर असे ‘गीत रामायण’ही सर्वप्रथम पुण्यातच अवतरले. त्यामुळे गदिमांचे भव्य स्मारक पुण्यात व्हावे, यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक वर्षे पाठपुरावा केला होता.

हेही वाचा: नितीन गडकरींनी अंजीर-सीताफळ वाहतुक व विक्री साखळी मजबूतीची घेतली जबाबदारी

मुंबई-बेंगळुरू महामार्गालगत चांदणी चौकापासून पुढे वारज्याच्या दिशेला असलेल्या महात्मा सोसायटीतील सव्वासहा एकर जागेत भव्य गदिमा स्मारक आणि प्रदर्शन केंद्र साकारणार आहे. जवळपास एक लाख चौरस फुटांवरील या वास्तूत गदिमांच्या स्मृती जतन करणार आहेत. या स्मारकात गीत रामायण, साहित्य, चित्रपट आणि डिजिटल दालनांसह गदिमांच्या वैयक्तिक वस्तूंचा संग्रह असलेले स्वतंत्र दालन असणार आहे. याव्यतिरिक्त स्मारकात ४०० आसनव्यवस्थेचे नाट्यगृह असणार आहे. प्रायोगिक रंगभूमीवरील नाट्य कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी या नाट्यगृहाचा प्रामुख्याने उपयोग केला जाईल.

‘गीत रामायणा’तील ५६ गीतांची शिल्पे गीत रामायण दालनात असणार आहेत. त्याचबरोबर स्वरतीर्थ सुधीर फडके व मूळ गायकांच्या आवाजातील गाणी ऐकण्याची सोयही इथे असेल. मूळ प्रसारणातील गायक-वादकांच्या छायाचित्रांचाही त्यात समावेश असेल. साहित्य दालनात गदिमांनी लिहिलेली सर्व ३७ पुस्तके मांडलेली असतील. गदिमांच्या आवाजातील विविध साहित्यिक भाषणे व कविता ऑडिओ बूथवरून ऐकता येणार आहेत.

गदिमांच्या १५७ मराठी व २५ हिंदी चित्रपटांचे दालन या स्मारकात असणार आहे. सर्व चित्रपटांची सूची, तसेच उपलब्ध मूळ भित्तिचित्रे या दालनात लावण्यात येतील. निवडक चित्रपटांतील गाणी आणि चित्रपट निर्मितीच्या कथा या ठिकाणी असणाऱ्या ऑडिओ बूथवरून ऐकण्याची पर्वणी रसिकांसाठी उपलब्ध होणार आहे.

मराठी साहित्याला समृद्ध करणाऱ्या गदिमांचे पुण्यातील वास्तव्य हे पुण्यासाठी भूषण होते. त्यांच्या वास्तव्याने शहराची साहित्यश्रीमंती आणखी वाढली. त्यांचे यथोचित स्मारक उभारणे, हे आम्ही आमचे कर्तव्यच समजतो.

- मुरलीधर मोहोळ, महापौर

loading image
go to top