

पुणे, ता. २९ : यंदाचा गणेशोत्सव व विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडावी, गर्दीचे नियोजन, वाहतूक व पार्किंग व्यवस्था सक्षम करावी, अडथळे दूर करून उत्सव अधिकाधिक चांगला होईल, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी गणेशोत्सव मंडळांनी पुणे पोलिसांनी घेतलेल्या बैठकीत केली.
परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त कृषिकेश रावळे यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी फरासखाना पोलिस ठाण्याच्या परिसरात गणेश मंडळांची बैठक घेण्यात आली. या वेळी श्री कसबा गणपती मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत शेट्ये, तांबडी जोगेश्वरीचे प्रशांत टिकार, गुरुजी तालीम मंडळाचे प्रवीण परदेशी, तुळशीबाग मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, नितीन पंडित, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी मंडळाचे सूरज रेणुसे, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळाचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, बाबू गेनू मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, जिलब्या मारुती मंडळाचे भूषण पंड्या आदी उपस्थित होते.
विसर्जन मिरवणुकीत किती पथके असावीत, मंडळांमधील अंतर कमी करावे, असे मुद्दे पोलिसांकडून मांडण्यात आले. त्यावर प्रत्येक वर्षी संबंधित विषयावर चर्चा होऊन मार्ग काढला जातो. त्यामुळे त्याच विषयांवर पुन्हा चर्चा नको. यापेक्षा व्यवस्था सक्षम करण्यासाठी काय बदल केले पाहिजेत, हे सुचवावे. तसेच गणेशोत्सव व मिरवणूक कालावधीत वाहतूक व पार्किंग व्यवस्थेचे नियोजन होणे गरजेचे असून त्यावर पोलिसांनी भर द्यावा, अशी मागणी मंडळांनी केली.
शेट्ये म्हणाले, ‘‘गणेशोत्सव व विसर्जन मिरवणूक अधिक चांगल्या पद्धतीने कशी साजरी होईल, त्यासाठीची व्यवस्था काय असणार यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. वेगवेगळ्या पर्यायांवर मंडळांनी आपली मते मांडली आहेत. उत्सव चांगल्या पद्धतीने पार पडावा, यासाठी गणेशोत्सव मंडळे प्रयत्नशील आहेत.’’