जिल्ह्यात सहा दिवस आव्वाज

जिल्ह्यात सहा दिवस आव्वाज
Published on

बारामती, ता. ४ : आगामी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात सहा दिवस ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणा रात्री १२ वाजेपर्यंत वापरण्यास वेळेची सवलत देण्यात आली आहे. मात्र, ही सवलत केवळ वेळेच्या मर्यादेसाठी असून निर्धारित ध्वनिमर्यादेचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हा आदेश जारी केला. त्यानुसार, गणेशोत्सवातील १९, २०, २२, २३, २४ आणि २५ सप्टेंबर हे सहा दिवस सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक यंत्रणा वापरण्यास परवानगी असेल. मात्र, संबंधित परिसरासाठी निश्चित करण्यात आलेल्या ध्वनिमर्यादेपेक्षा अधिक आवाज करण्यास परवानगी नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रुग्णालये, न्यायालये, शैक्षणिक संस्था तसेच नियमानुसार घोषित करण्यात आलेल्या शांतता क्षेत्रांमध्ये ही सवलत नसेल. अधिसूचित सहा दिवस वगळता इतर दिवशी ध्वनिक्षेपक वापराबाबत प्रचलित वेळेचे नियम लागू राहतील. गणेशोत्सव मंडळांनी उत्सव साजरा करताना रुग्ण, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. ‘वेळेची सवलत आहे; मात्र ध्वनिमर्यादेची सवलत नाही,’ हे लक्षात घेऊन शांततामय, सुरक्षित व शिस्तबद्ध गणेशोत्सवासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

ध्वनिपातळीची होणार तपासणी
पोलिस प्रशासनाकडून आवश्यकतेनुसार, ध्वनिपातळीची तपासणी करण्यात येणार आहे. निर्धारित ध्वनीमर्यादा, वेळेची अट किंवा सक्षम प्राधिकरणाच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com