esakal | Pune : फिरत्या विसर्जन हौदाला प्रतिदिन साडे अकरा लाखाचा खर्च
sakal

बोलून बातमी शोधा

Pune : फिरत्या विसर्जन हौदाला प्रतिदिन साडे अकरा लाखाचा खर्च

Pune : फिरत्या विसर्जन हौदाला प्रतिदिन साडे अकरा लाखाचा खर्च

sakal_logo
By
​ ब्रिजमोहन पाटील

पुणे : पुणे महापालिकेने गणेश विसर्जनासाठी फिरत्या हौदासाठी सव्वा कोटी रुपये खर्चून निविदा काढली आहे. यामध्ये केवळ नागरीकांच्या पैशांची उधळपट्टी होत असून, प्रति दिवस तब्बल साडे अकरा लाखाचा खर्च होत आहे. त्यामुळे या प्रकरणाची अधिकार्यांचे निलंबन करून चौकशी करा अशी मागणी सजग नागरिक मंचाने केली आहे.

विसर्जन हौदाबाबत 'सकाळ'ने वृत्त प्रकाशित केले होते. पुणे महापालिकेच्या घनकचरा विभागाने गणेश विसर्जनासाठी सव्वा कोटी रुपये खर्चून भाड्याने साठ मिनी ट्रक व फिरते हौद अकरा दिवसांसाठी भाड्याने घेतले आहेत. याचाच अर्थ प्रतिदिन यासाठी साडेअकरा लाख रुपये खर्च होणार आहे. या संदर्भाने अनेक प्रश्न उभे रहात आहेत, याबाबत खूलासा करावा अशी मागणी मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केली आहे.

  • गणेशोत्सव दहा दिवसांचा असताना अकरा दिवसांचे भाडे का दिले जाणार आहे ? यंदा मिरवणुकांना परवानगी नसल्याने विसर्जन अनंत चतुर्दशी ला म्हणजे दहाव्या दिवशी पूर्ण होणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच गणेश चतुर्थी ला कोणत्याच गणपतीचे विसर्जन होत नसल्याने त्या दिवशीचे पैसे वायाच जाणार आहेत , म्हणजेच पहिल्या व अकराव्या दिवसाचे मिळून तेवीस लाख रुपये कंत्राटदाराला नाहक दिले जाणार आहेत.

  • पुणेकरांना गेली अनेक वर्षे ठराविक जागी ठेवल्या जाणार्या हौदांमध्ये गणेश विसर्जनाची सवय झाली आहे. मग हे फिरते हौद घेऊन विनाकारण पैशांचा अपव्यय कशासाठी ? गेल्या वर्षी नागरीकांना संचारबंदी चे पालन करावे लागत होते त्यामुळे फिरत्या विसर्जन हौदांची संकल्पना ठीक होती , पण यंदा तसे काही नसल्याने फिरत्या हौदांची गरज काय ?

  • गेल्या वर्षी ३० फिरते हौद भाड्याने घेतले होते आणि ते पुरलेही होते , असे असताना यंदा साठ फिरते हौद घेण्याची गरज काय ? यंदा दुप्पट संख्येने गणपती बसवले जाणार असल्याचा साक्षात्कार कोणाला झाला ?

  • मुळात जास्तीत जास्त गणपतींचे विसर्जन दुसर्या , पाचव्या , सातव्या व दहाव्या दिवशी होत असल्याने उर्वरीत सात दिवस दहा- बारा फिरते हौद पुरेसे झाले असते तरी सर्व दिवस साठ हौदांचा अट्टाहास कुणाचा ? त्यासाठी लाखो रुपयांचा विनाकारण भुर्दंड सोसावा लागतो आहे.

  • मिनी ट्रक , त्यावरील हौद आणी ड्रायव्हरसह चार माणसांसाठी १९१२१ रुपये प्रतिदिन भाडेखर्च योग्य असल्याचं कोणी ठरवलं ?

  • महापालिकेच्या साठ फिरत्या विसर्जन हौदां व्यतिरिक्त अनेक प्रभागांमध्ये नगरसेवकांनी स्वतः चे फिरते विसर्जन हौदही ठेवले आहेत , म्हणजे महापालिकेच्या हौदांचा उपयोग किती प्रमाणात होईल हा प्रश्नच आहे.

महापालिकेचं हे कंत्राट पुणेकरांऐवजी कंत्राटदाराच्या फायद्याचं ठरणार आहे. महापालिकेतील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे आजवर गाजली मात्र श्री गजाननाच्या विसर्जनाच्या टेंडर मधेही घोटाळा म्हणजे हद्द झाली. आपणास विनंती की नागरीकांच्या करांचे पैशांची उधळपट्टी करणार्या अधिकार्यांचे निलंबन करून प्रकरणाची चौकशी करावी, अशी मागणी वेलणकर यांनी केली आहे.

loading image
go to top