Pune : गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी शहरात मारहाणीच्या चार घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी शहरात मारहाणीच्या चार घटना

पुणे : गणेशोत्सव विसर्जनाच्या दिवशी शहराच्या वेगवेगळ्या भागात किरकोळ वादातून मारहाणीच्या घटना घडल्या. लोहियानगर, कासेवाडी, रास्ता पेठ, औंध या परिसरात घटना घडल्या असून याप्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात चार गुन्हे दाखल झाले आहेत.

कासेवाडी येथे झालेल्या मारहाणीच्या घटनेप्रकरणी साहिल अंबादास भोंगे (वय 20, रा. कासेवाडी, भवानी पेठ) याने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन देवा संजय कांबळे, नजीर वसीम शेख, आसिफ बाबुलल शेख (वय 22, रा. कासेवाडी, भवानी पेठ), अदनान यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संशयित आरोपी नजीर व आसिफ शेख यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी साहिल याची आरोपींसमवेत पाच महिन्यांपूर्वी भांडणे झाली होती.

दरम्यान, गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक पाहून तो शुक्रवारी रात्री घरी जात होता. त्यावेळी आरोपी कांबळे, शेख यांनी त्याला अडवले. त्याला धमकावून जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी साहिलच्या चेहऱ्यावर कुऱ्हाडीने वार केला. त्यानंतर त्याच्या डोक्‍यात दगड मारुन आरोपी पसार झाले. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक नितीनकुमार नाईक तपास करीत आहेत.

लोहियानगरमधील घटनेप्रकरणी स्वप्निल सतीश साळुंके (वय 25, रा.लोहियानगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन अंकुश विठ्ठल कांबळे (वय 22, रा. लोहियानगर) यास अटक करण्यात आली आहे. विसर्जन मिरवणुकीत नाचताना झालेल्या किरकोळ वादातून अंकुशने स्वप्नील साळुंके याच्यावर कोयत्याने वार केले. या घटनेत स्वप्नील गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुरज कुतवळ करीत आहेत.

रास्ता पेठेतील घटनेमध्ये राहुल दिगंबर कुंजीर (वय 29, रा. गणेश पेठ, दूध भट्टीजवळ) हा तरुण जखमी झाला आहे. त्याने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन विराज आम्रे, किरण शिवरकर, यश वालिया (रा. रास्ता पेठ) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश पेठेतील प्रताप मित्र मंडळाच्या विसर्जन मिरवणुक सुरु होती. त्यावेळी राहूलचा मित्र देवेंद्र दत्तुर यास विराज आम्रे हा मारहाण करीत होती. त्यावेळी राहूल त्याला सोडविण्यासाठी तेथे गेला. त्यावेळी आरोपींनी त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके करीत आहेत.

औंधमधील इंदिरा वसाहतीत विसर्जन मिरवणुकीत धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. बाजीराव विजय मोरे (वय 27, रा. इंदिरा वसाहत, गणेशखिंड रस्ता, औंध) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. मोरे याने याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोरे व त्याचे मित्र वसाहतीतील विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी निघाले होते. त्या वेळी धक्का लागल्याने प्रेम वाघमारे, अनिकेत पवार, शुभम गायकवाड, नयन लोंढे, अमित साबळे, आदित्य वाघमारे, मयूर लोंढे, रोहन वाघमारे आणि साथीदारांनी मोरेला बेदम मारहाण केली. दगडफेक करुन परिसरात दहशत माजविली. आरोपी शुभम गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्यास पोलिसांनी अटक केली आहे.

Web Title: Pune Ganeshotsav Ganesh Visarjan Beating Event Four Cases Were Registered

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..