

पुणे, ता. २१ : ‘‘लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ पुणे शहरात रोवली. या वैभवशाली आणि गौरवशाली गणेशोत्सवाची ऐतिहासिक नोंद कायमस्वरूपी व्हावी, यासाठी पुणे महापालिकेने ठराव करून गणेशोत्सवासंबंधीचे टपाल तिकीट व्हावे, म्हणून टपाल खात्याला पत्र लिहावे, म्हणजे पुढील वर्षापर्यंत गणेशोत्सवावरील टपाल तिकीट प्रकाशित होईल,’’ अशी अपेक्षा केंद्रीय सहकारिता आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोमवारी महापौर मंजूषा नागपुरे यांच्याकडे व्यक्त केली.
टपाल खात्याच्या पुणे विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात मोहोळ बोलत होते. या वेळी आमदार हेमंत रासने, महापौर मंजूषा नागपुरे, टपाल खात्याच्या गोवा व महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल रामचंद्र जायभाये, पुणे विभागाच्या पोस्ट मास्तर जनरल प्रीती अग्रवाल, टपाल सेवा संचालक अभिजित बनसोडे, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश शेळके उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते, गणेशोत्सव-महाराष्ट्राचा राज्य उत्सव या विषयावरील विशेष टपाल आवरणाचे (पाकीट) प्रकाशन करण्यात आले.
या वेळी मोहोळ म्हणाले, ‘‘पुण्याच्या उत्सवाचा सन्मान डाक विभागाने केला आहे. त्याबद्दल मी डाक विभागाचे विशेष आभार मानतो. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला. मागच्या पिढीने गणेशोत्सवातील अनेक स्थित्यंतरे पाहिली आणि आजही पाहत आहे. पुणे शहराच्या गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे. गणेशोत्सवाला राज्य सरकारनेदेखील राज्य महोत्सवाचा दर्जा दिला. पुण्याचा हा उत्सव देशपातळीवर पोहोचला. हा उत्सव अधिक समृद्ध करून आमची परंपरा जगभर पोहोचविण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. अशा वैभवशाली उत्सवाची परंपरा टपाल तिकिटातून कायमस्वरूपी जपली जावी.’’
आमदार हेमंत रासने म्हणाले, ‘‘पुण्याच्या वैभवशाली गणेशोत्सवाचे विशेष पाकिट प्रकाशित होत असून, याचा अभिमान गणेशोत्सव मंडळांना झाला आहे.’’ महापौर नागपुरे म्हणाल्या, ‘‘टपाल विभागाने पुण्याच्या ऐतिहासिक गणेशोत्सवाची विशेष दखल घेतली, त्याबद्दल टपाल विभागाचे मनापासून अभिनंदन करते.’’
‘पुणे गणेशोत्सव खऱ्या अर्थाने लोकोत्सव’
‘‘गणेशोत्सव आणि लोकसहभाग या वेगळ्या गोष्टी असू शकत नाहीत. त्यामुळे पुणेकरांना अभिप्रेत आणि अपेक्षित असाच गणेशोत्सव साजरा केला जाईल,’’ असे मत व्यक्त करून मोहोळ म्हणाले, ‘‘सर्वसामान्य पुणेकरांचा सहभाग अधिकाधिक वाढवून हा उत्सव खऱ्या अर्थाने ‘लोकोत्सव’ म्हणून अधिक व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न राहील.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.