
पुणे : सोन्याला झळाळी, बांधकाम क्षेत्रातही उत्साह
पुणे : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे दोन वर्षांपासून पूर्ण न झालेला अक्षय तृतीयेच्या निमित्ताने सोने खरेदीचा मुहूर्त अनेक पुणेकरांना साधला. त्यामुळे सराफ व्यवसायातील उलाढालीला मोठी चकाकी आली. हीच स्थिती बांधकाम क्षेत्राच्या बाबत देखील पाहायला मिळाली. अनेकांनी आज आपल्या स्वप्नातील घर बुक केले. त्यामुळे बांधकाम क्षेत्राला देखील यानिमित्ताने मोठा प्रतिसाद मिळाला.
गेल्या काही दिवसांत नागरिकांची स्वत:चे घर घेण्याची मानसिकता वाढली आहे. नागरिकांचा बदललेला हा कल आणि बांधकाम व्यावसायिकांकडून देण्यात येत असलेल्या आॅफर, गृहकर्जाचे अल्प दर यामुळे घरांच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्याचेच परिवर्तन प्रत्यक्षात घर बुक करण्याच्या निर्णयात झाले, अशी माहिती बांधकाम व्यवसयिकांनी दिली. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी करण्याची परंपरा आपल्याकडे आहे. त्यात आता सोन्याचे दर कमी होऊन स्थिर झाले आहेत. तसेच आगामी लग्नसरार्इमुळे मोठ्या प्रमाणात सोन्याची देखील खरेदी झाली, अशी माहिती सराफ व्यावसायिकांनी दिली.
शनिवारी किरकोळ बाजारात २२ कॅरेट सोने ४९ हजार रुपये तर २४ कॅरेट सोने ५१ हजार १०० रुपये प्रति दहा ग्रॅम होते. तर चांदी ६४ हजार रुपये किलो होती. खरेदीसाठी सकाळपासून सराफी पेढ्यांवर नागरिकांची गर्दी होती. त्यामुळे गुढीपाडव्याच्या सोने खरेदी-विक्रीसाठी शनिवारचा दिवस चांगला ठरला.
वेढणीची मागणी वाढली :
२०१९ मध्ये जी वेढणी ३२ हजार रुपयांना मिळत होती ती आज ५१ हजार रुपयांना झाली आहे. गेल्या तीन वर्षांत ही मोठी दरवाढ झाली आहे. मात्र असे असले तरी वेढणीची मागणी अद्याप कायम आहे. लॉकेट, चैन, मंगळसूत्र, कर्णफुले, अंगठ्या यांची मंगळवारी मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यासह खरेदीत कमी वजनाचे टेम्पल ज्वेलरी तसेच, पिंक गोल्ड, रोज गोल्डची तर लहान लहान गुंतवणुकीसाठी सोन्याची वेढी शिक्के याला मागणी होती.
सोने खरेदीसाठी मंगळवारी सकाळपासूनच गर्दी झाली होती. अन्यथा नागरिक दुपारी चारनंतर खरेदीसाठी येत असल्याचा अनुभव आहे. २०१९ च्या तुलनेत उलाढाल ३० ते ३५ टक्क्यांनी वाढली आहे. तर खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांची संख्या देखील ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. वेढणीला मोठी मागणी होती. गुढीपाडव्याच्या तुलनेत अक्षय तृतीयेला जास्त उलाढाल झाली आहे. ज्यांनी लग्नासाठी सोन्याचे बुकिंग केले होते त्यांनी आपले सोन आज घरी नेले.
अतुल अष्टेकर, भागीदार, कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स
गेल्या दोन वर्षामध्ये यंदाच्या अक्षय तृतीयेला सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. चौकशीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या देखील वाढत आहे.यातून बांधकाम क्षेत्रातील उत्साह स्पष्ट होतो. कोरोनानंतर घरांच्या मागणीचा ट्रेंड बदलला आहे. त्यामुळे ज्यांचे आताचे घर २ बीएचके आहे ते ३ बीएचके मध्ये किंवा त्यापेक्षा मोठ्या घरांत शिफ्ट होत आहेत.अमोल रावेतकर, संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक, रावेतकर ग्रुप कोरोनाच्या संकटाला तोंड देऊन गृहनिर्माण विकसक पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. या महामारीच्या संकटातून गेलेल्या नागरिकांनाही आता स्वतःच्या घराचे महत्त्व लक्षात आले आहे. गेल्या काही महिन्यांत सरकारने दिलेल्या सवलतींचा फायदा गृह खरेदीदारांना झाला. स्टॅम्प ड्युटीमधील सवलत, गृहकर्ज व्याजदरात केलेली ऐतिहासिक कपात, महिला खरेदीदारांना स्टॅम्प ड्युटीमध्ये देण्यात आलेली सवलत यामुळे गृहविक्रीचे प्रमाण वाढले आहे. यातील काही सवलती आजही लागू असल्याने नागरिकांना त्याचे लाभ मिळत आहेत.
अनिल फरांदे, अध्यक्ष, क्रेडाई पुणे मेट्रो
सोन्याचे दर (प्रति दहा ग्रॅम)
२२ कॅरेट - ४९०००
२४ कॅरेट - ५११००
चांदी ६४ हजार रुपये किलो
६१६६०, ६६६६१
लक्ष्मी रस्ता : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी करताना नागरिक.
Web Title: Pune Gold And Home Purchase Occasion Of Akshay Tritiya
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..