Pune : पुण्यातील गुगलचे ऑफिसच्या धमकीमागचं रहस्य उलगडलं, कर्मचाऱ्याच्या भावानेच केला फोन Pune Google office bomb threat Excitement arrested Hyderabad | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Google office

Pune : पुण्यातील गुगलचे ऑफिसच्या धमकीमागचं रहस्य उलगडलं, कर्मचाऱ्याच्या भावानेच केला फोन

पुणे : पुण्यातील मुंढवा येथील गुगलचे कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकीचा निनावी फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली. बॉम्बशोधक व नाशक (बीडीडीएस) पथकाने गुगलचे कार्यालय आणि परिसरात कसून तपासणी केली. परंतु पथकातील कर्मचाऱ्यांना घटनास्थळी काहीही संशयास्पद आढळून आले नाही. दरम्यान, मुंबई पोलिसांनी निनावी फोन करणार्‍या व्यक्तीस हैदराबाद येथून अटक केली आहे.

पुण्यातील मुंढवा परिसरात एका कमर्शियल बिझनेस सेंटरच्या इमारतीमध्ये ११ व्या मजल्यावर गुगलचे कार्यालय आहे. रविवारी रात्री मुंबईतील गुगलच्या कार्यालयात एकाचा निनावी फोन आला. त्या व्यक्तीने पुण्यातील गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. त्यावर गुगलच्या अधिकाऱ्यांनी मुंबई पोलिसांना ही माहिती दिली.

मुंबई पोलिसांनी ही बाब पुणे पोलिसांना कळविली. त्यानंतर तातडीने मुंढवा पोलिस आणि बॉम्बशोधक व नाशक पथक गुगलच्या कार्यालयात पोचले. त्यांनी संपूर्ण कार्यालय आणि इमारतीच्या परिसरात तपासणी केली. मात्र, काहीही तथ्य आढळून आले नाही.

मुंबई पोलिसांनी फोन करणार्‍याचा शोध घेतला असता, तो हैदराबाद येथून आल्याचे निष्पन्न झाले. हैदराबाद पोलिसांच्या मदतीने निनावी फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे. तो पुण्यातील गुगल कार्यालयात काम करणार्‍या एका कर्मचार्‍याचाच भाऊ आहे. रात्री मद्यधुंद अवस्थेत त्याने हा फोन केल्याची माहिती समोर आली आहे.