भेसळीपासून सावधान! ऐन गणेशोत्सवात पुण्यात 900 किलो पनीर जप्त

हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील मे.आर.एस डेअरी फार्म या विनापरवाना कारखान्यात छापा
भेसळीपासून सावधान! ऐन गणेशोत्सवात पुण्यात 900 किलो पनीर जप्त

गणेश उत्सवाच्या दरम्यान अन्न व औषध प्रशासन पथकाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्यावतीने पुण्यातील हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील मे.आर.एस डेअरी फार्म या विनापरवाना कारखान्यात छापा मारला. यामध्ये कारखान्यात बनावट पनीर बनवत असल्याचे आढळून आल्याने पथकाने कारवाई करून पनीर आणि दूध पावडरचा मोठा साठा जप्त केला आहे.

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मे.आर.एस या डेअरी फार्म कारखान्यावर छापा टाकून बनावट पनीर जप्त केले. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने 1 लाख 97 हजार 780 रुपये किंमतीचे 899 किलो बनावट पनीर, पनीर बनविण्यासाठी वापरली जाणारी 2 लाख 19 हजार 600 रुपये किंमतीची 549 किलो स्किम्ड मिल्क पावडरही जप्त केली आहे.

त्याचबरोबर 4 हजार 544 रुपये किंमतीचे 28.4 किलो बी डी पामोलीन तेल असा एकूण सर्व 4 लाख 21 हजार 924 रुपये किंमतीचा साठा पथकाने जप्त केला आहे. पनीर हा पदार्थ नाशवंत असल्याने जप्त केलेला साठा पथकाने जागेवरच नष्ट केला आहे. तसेच या बनावट पनीरचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेडे पाठवण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Sakal
www.esakal.com