Doctor : डॉक्टरांना बनविले चक्क कारकून!

रुग्णांना तपासणाऱ्या, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना चक्क कारकुनी कामाला लावल्याची खळबळजनक माहिती पुढे आली.
Doctor
Doctorsakal
Summary

रुग्णांना तपासणाऱ्या, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना चक्क कारकुनी कामाला लावल्याची खळबळजनक माहिती पुढे आली.

पुणे - रुग्णांना तपासणाऱ्या, त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना चक्क कारकुनी कामाला लावल्याची खळबळजनक माहिती पुढे आली. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांची बुद्धिमत्ता आता महापालिकेच्या फायलींमध्ये अडकल्याचे चित्र दिसते. स्त्रीरोगतज्ज्ञांना क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त केल्याने त्याचा थेट फटका शहरातील रुग्णसेवेला बसतो आहे. ‘आम्ही पेशंट तपासण्यासाठी डॉक्टर झालो; पण महापालिकेने आमचे करिअर ‘फायली क्लिअर करण्यात घालवले,’ अशा शब्दांत आता डॉक्टर त्यांच्या भावना व्यक्त करीत आहेत.

महापालिकेमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञांच्या १५ पैकी सात जागा रिक्त असल्याचे वृत्त ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झाले. त्यापुढे जाऊन सध्या कार्यरत सातपैकी किती स्त्रीरोग तज्ज्ञ प्रत्यक्षात रुग्णालयात वैद्यकीय सेवेमध्ये आहेत, या प्रश्नाचे उत्तर शोधताना ही माहिती पुढे आली.

रचना कशी आहे?

महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या रचनेत चार वर्गांमध्ये ११९ पदे आहेत. त्यात अधिकारी आणि विशेषज्ज्ञ डॉक्टरांचा वर्ग एकमध्ये समावेश आहे. निवासी वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, अशा वेगवेगळ्या १३ पदे वर्ग दोनमध्ये आहेत. या दोन वर्गांमध्ये सर्वजण डॉक्टर असतात. त्यात क्लिनिकल आणि प्रशासकीय असे दोन प्रकार पडतात. प्रत्यक्षात रुग्णाला तपासतात, प्रसूती करतात ते क्लिनिकल डॉक्टर आणि पब्लिक हेल्थ डिप्लोमा करून प्रशासकीय कामे करणारेदेखील डॉक्टरच असतात.

नेमकी समस्या काय?

रुग्णांना तपासणारे, त्यांच्या आजाराचे निदान करणारे, त्यानुसार औषधोपचाराचा सल्ला देणाऱ्या क्लिनिकल डॉक्टरांना महापालिकेने कारकुनी काम करायला लावलं आहे, ही सध्याची मुख्य समस्या आहे. स्त्रीरोग तज्ज्ञांना रुग्णालयात रुग्णसेवेचे काम देण्याऐवजी क्षोत्रिय कार्यालयात वैद्यकीय अधिकाऱ्याचे काम सोपविण्यात आले आहे. त्यामुळे फक्त स्त्रीरोगतज्ज्ञ नाही तर, कान-नाक-घसा तज्ज्ञांनीही या कामांना जुंपले जात असल्याचे दिसते. त्यांची वैद्यकीय शिक्षणातील हुशारी प्रशासनाच्या फायलींमध्ये अडकल्याची चित्र महापालिकेच्या आरोग्य विभागात दिसते. या बाबत एक डॉक्टर म्हणाले, ‘‘इतक्या वर्षांच्या कारकुनी कामामुळे मी आता रुग्णांना तपासणे विसरलो. वैद्यकीय ज्ञान सातत्याने अद्ययावत करावे लागते; अन्यथा ते कालबाह्य होते. वैद्यकशास्त्र हे प्रगत आहे. त्यात सातत्याने नवीन तंत्र, उपचार पद्धती येतात. महापालिकेतील अवैद्यकीय कामामुळे रुग्णसेवेपासून दूर जावे लागले.’’

अशी आहे वस्तुस्थिती

  • महापालिकेच्या सेवेत राहून सुमारे १५ जणांनी सार्वजनिक आरोग्य सेवेच्या पदविकेचे शिक्षण घेतले आहे. त्यांच्या ज्ञानाचा फायदा नागरिकांना होण्यासाठी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी पदावर त्यांना नियुक्त करणे गरजेचे आहे. पण, हे काम नको म्हणून रुग्णालयाचे काम घेतले जाते.

  • स्त्रीरोग तज्ज्ञांना सोनोग्राफी करण्याचा अधिकार कायद्याने दिला आहे. त्यामुळे महापालिकेतील काही स्त्रीरोगतज्ज्ञ फक्त हेच काम करतात.

  • ज्यांच्याकडे सार्वजनिक आरोग्याची पदविका नाही. ते क्लिनिकल डॉक्टर आहेत. त्यांना क्षेत्रीय कार्यालयातील वैद्यकीय अधिकाऱ्याची जबाबदारी दिली आहे.

रुग्णसेवेला प्राधान्य हवे

महापालिकेच्या आरोग्य खात्याने कामाची रचना करताना रुग्णसेवाकेंद्रित व्यवस्थेला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळे स्त्रीरोगतज्ज्ञांनी प्रत्यक्ष रुग्णसेवा केल्यास त्यांचे ज्ञान आणि अनुभवाचा उपयोग रुग्णांना होईल.

समस्येवरील उपाय काय?

  • महापालिकेच्या आरोग्य खात्यात शैक्षणिक पात्रतेप्रमाणे कामाची विभागणी झाली पाहिजे.

  • सार्वजनिक आरोग्याची पदविकाधारकांना त्यांच्या अर्हतेप्रमाणे जबाबदारी सोपवावी

  • क्लिनिकल डॉक्टरांना रुग्णसेवेच्या कार्यात सहभागी करून घ्यावे

आरोग्य विभागात उपलब्ध मनुष्यबळाचा आढावा घेण्यात येणार असून, त्यातून पुढे आलेल्या निष्कर्षानुसार कामाची फेररचना करण्यास प्राधान्य दिले जाईल. स्त्रीरोगतज्ज्ञ क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असल्याची माहितीही यात घेण्यात येणार आहे.

- डॉ. भगवान पवार, आरोग्य प्रमुख, पुणे महापालिका

वर्ग मंजूर पदे एकूण कार्यरत रिक्त पदे

वर्ग एक १४२ ३६ १०६

वर्ग दोन २६२ १६३ ९९

(त्या व्यतिरिक्त ४८ करारतत्त्वावर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com