esakal | पुण्यातील रुग्णालयांचे ‘सुरक्षा ऑडिट’ राम भरोसे; सक्षम यंत्रणेचा अभाव

बोलून बातमी शोधा

Oxygen Cylinder
पुण्यातील रुग्णालयांचे ‘सुरक्षा ऑडिट’ राम भरोसे; सक्षम यंत्रणेचा अभाव
sakal_logo
By
दिलीप कुऱ्हाडे

पुणे - नाशिक येथील महापालिकेच्या रुग्णालयातील प्राणवायूच्या गळतीमुळे २४ जणांचा मृत्यूमुळे शहरातीलच नव्हे तर राज्यातील अनेक रुग्णालयातील सुरक्षा ऑडिटचा प्रश्‍न ऐरणीवर आला आहे. रुग्णालयाचे बांधकामाचे स्ट्रक्चरल, फायर ऑडिट असो की आता ऑक्सिजन प्लांटचे सुरक्षा ऑडिट करायचे कोणी, यातील सक्षम यंत्रणा कोणती असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीत असल्याचे दिसून येते. नाशिक येथील दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेने जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांचे सुरक्षा ऑडिट करण्यासाठी संबंधित रुग्णालयाच्या प्रशासनला आदेश देण्यात यावे अशी विनंती निवासी जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

शहरातील रुग्णालयांना आरोग्य परवाना महापालिका आरोग्य विभागाकडून देण्यात येते. त्यानंतर नियमित शुल्क भरून दरवर्षाला त्याचे नुतनिकरण कार्यालयातूनच होते. त्यामुळे प्रत्यक्ष रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाण्याचा प्रश्‍नच येत नाही. तर रुग्णालयाच्या इमारतीचा बांधकाम विभागातून परवाना घेतल्यानंतर वर्षांनुवर्ष त्याचे स्ट्रक्चरला ऑडिट होतेच असे नाही. झालीच तर कोण करते याचे उत्तर गुलदस्त्यातच आहे. त्याप्रमाणे फायर ऑडिटसाठी राज्य सरकारने परवाना दिलेल्या कोणत्याही अेका संस्थेकडून खासगी रुग्णालय फायर ऑडिट करून घेतात. त्याचा अहवाल ते महापालिकेच्या मुख्य अग्निशमन विभागाला देतात.

हेही वाचा: विरंगुळा हरवल्याने ज्येष्ठांची होतेय घुसमट

शहरातील खासगी रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटचे सुरक्षा तपासणी कोणती यंत्रणा करते याबाबत महापालिका व खासगी रुग्णालयात अनभिज्ञ आहेत. तर काही रुग्णालय ज्यांच्याकडून प्लांट बसवून घेतात त्यांच्याकडूनच सुरक्षा तपासणी करीत असल्याचे सांगितले. तर महापालिका प्लांटची तपासणी करणारी अशी त्रयस्थ संस्था नसल्याचा दुजोरा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे. तर शहर व जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांतील ऑक्सिजन प्लांटच्या सुरक्षा ऑडिटसाठी संबंधितानी करून घेण्या संदर्भात आदेश निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी द्यावेत, अशी विनंती पुणे महानगरपालिकेने केल्याची माहिती बोनाला यांनी दिली. तर स्ट्रक्चरल ऑडिट संदर्भात बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता राजेंद्र राऊत व आरोग्य परवाना संदर्भात आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

‘महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त कुणाल खैरनार यांच्यासह नायडू, जंम्बो रुग्णालय आणि बाणेर येथील कोव्हिड रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. येथील प्लांटच्या देखरेखीसाठी अभियंतेत ठेवले आहेत.’’

- श्रीनिवास कुंदुल, अधिक्षक अभियंता, विद्युत विभाग, पुणे महानगरपालिका

‘महापालिकेच्या रुग्णालयातील अग्निशमन यंत्रणेचे ऑडिट व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्याक्षिके अग्निशमन विभाग देते. मात्र खासगी रुग्णालय मान्यता प्राप्त शहरातील संस्थांकडून फायर ऑडिट करून तसा अहवाला विभागाला देते.’’

- प्रशांत रणपिसे, मुख्य अग्निशमन प्रमुख, पुणे महानगरपालिका