
पुणे : पुण्यातील सर्वात मोठ्या ‘आयटी हब’पैकी खराडी ‘आयटी हब’ मागील २५ वर्षांत झपाट्याने उदयास आले आहे. आज जगातील नामांकित कंपन्यांसहीत सहाशे कंपन्या एकट्या खराडीत आहेत, तर त्या पाठोपाठ विमाननगर आणि कल्याणीनगर भागात सव्वाशे कंपन्या आहेत. देशाच्या आर्थिक विकासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या खराडी ‘आयटी हब’ला मात्र विविध पायाभूत सुविधांच्या कमतरतेमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. येथील लहान व्यावसायिकांकडून आणि कंपन्यांना दमदाटी करून काही टोळकी लाखो रुपये उकळत आहेत. त्यामुळे त्यांची दहशत दिसून येते. याकडे दुर्लक्ष झाले आहे. सुमारे तीन लाख कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो.