Pune : रानडुकरांचा हैदोस; ऊस व भात शेतीचे नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रानडुकरांचा हैदोस; ऊस व भात शेतीचे नुकसान

गोऱ्हे बुद्रुक : रानडुकरांचा हैदोस; ऊस व भात शेतीचे नुकसान

sakal_logo
By
निलेश बोरुडे

किरकटवाडी : मागील पंधरा दिवसांपासून गोऱ्हे बुद्रुक (ता. हवेली) परिसरात रान डुकरांनी अक्षरशः हैदोस घातला असून ऊस व भात शेतीचे मोठे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांनी भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांच्याकडे याबाबत तक्रार अर्ज दिल्यानंतर आज कृषी आणि वनविभागाकडून पाहणी करून पंचनामे करण्यात आले.

गोऱ्हे बुद्रुक येथील शेतकरी भरत खिरिड यांच्या ऊसामध्ये रान डुकरांचे कळप मागील पंधरा दिवसांपासून ठाण मांडून बसले आहे. ऊसाबरोबरच आजूबाजूच्या भातशेतीचेही या रान डुकरांनी नुकसान केले आहे. सुदैवाने परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांची भात काढणी झालेली असल्याने त्यांचे नुकसान टळले आहे. ऊस शेतीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. वनपाल वैशाली हाडवळे, वनरक्षक सुनिता सुभेदार, कृषी सहाय्यक ललिता भोसले, कृषी सहाय्यक नितीन ढमाळ, तलाठी वर्षा आरमाळकर, ग्रामसेविका अर्चना चिंधे यांनी पाहणी करुन नुकसानीचे पंचनामे केले. यावेळी शेतकरी भरत खिरिड, विजय नानगुडे, मारुती खिरिड, सुशांत खिरिड आदी उपस्थित होते.

हेही वाचा: पुणे : जिल्ह्यातील १९४ ग्रामपंचायतींकडून रोजगार हमीचे एकही काम नाही

"मागील पंधरा दिवसांपासून रान डुकरांकडून शेतीचे नुकसान सुरू आहे. धरणाचे पाणी जवळ असल्याने त्यांनी शेतातच मुक्काम ठोकला आहे. वनविभागाकडून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी व रान डुकरांना शेतातून हाकलण्याची व्यवस्था करण्यात यावी."

- सुशांत खिरिड, ग्रा. पं. सदस्य, गोऱ्हे बुद्रुक.

"ऊस व भात शेतीचे नुकसान झाले आहे. नुकसानीची पाहणी केली आहे. मुल्यांकन करुन त्याचा अहवाल वनविभागाकडे सादर केला जाईल. त्यानुसार वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळेल."

-नितीन ढमाळ, कृषी सहाय्यक.

" रान डुक्कर हा संरक्षित वन्यप्राणी आहे. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. पंचनामा करण्यात आला असून शेतकऱ्यांना शासकीय नियमानुसार नुकसान भरपाई मिळेल."

-वैशाली हाडवळे, वनपाल,डोणजे

loading image
go to top