Pune Porsche Accident : संतापानंतर सखोल तपासाचा आदेश;पोलिसांना उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचना

कल्याणीनगर-विमाननगर परिसरात रात्री दीडनंतरही सुरू असलेले पब, अल्पवयीन मुलांनाही सर्रास दिले जाणारे मद्य, भरधाव आणि बेदरकार नंबरप्लेट नसलेली मोटार चालवून दोन निष्पापांचा घेण्यात आलेला जीव आणि त्यानंतरही त्याला तत्परतेने मिळणारा जामीन...
Pune Accident
Pune Accident sakal

पुणे : कल्याणीनगर-विमाननगर परिसरात रात्री दीडनंतरही सुरू असलेले पब, अल्पवयीन मुलांनाही सर्रास दिले जाणारे मद्य, भरधाव आणि बेदरकार नंबरप्लेट नसलेली मोटार चालवून दोन निष्पापांचा घेण्यात आलेला जीव आणि त्यानंतरही त्याला तत्परतेने मिळणारा जामीन... या सगळ्यांमुळे राज्यातील नागरिकांत निर्माण झालेल्या संतापाच्या लाटेची दखल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घ्यावी लागली.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी त्यांनी संपर्क साधून सखोल तपास करण्याचा आदेश सोमवारी दिला. दरम्यान, या प्रकरणात संबंधित अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती. राज्य उत्पादन शुल्क आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयानेही (आरटीओ) नोटिसा पाठविण्याचा सोपस्कार आज केला.

अल्पवयीन मुलगा मोटार चालवत होता. त्याच्याबरोबर मोटारीचा चालक आणि दोन मित्र होते. त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे चौकशी सुरू आहे. मोटारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क विभागाने ‘कोझी’ आणि ‘ब्लॅक’ हॉटेलला उशिरापर्यंत सुरू ठेवल्याबद्दल आणि अल्पवयीन मुलांना मद्य दिल्याबद्दल केवळ नोटिसा पाठविल्या, तर विनानंबर प्लेट वापरण्यात येत असलेल्या संबंधित अलिशान मोटारीबाबत ‘आरटीओ’नेही केवळ पोलिसांकडून माहिती मागविली आहे.

तसेच आरोपी असलेल्या अल्पवयीन मुलाने मोटार चालविताना मद्यपान केलेले होते, असे पोलिसांनी न्यायालयात म्हटले होते. सखोल तपासणी करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही, असे पोलिसांनी स्पष्ट केले. अल्पवयीन मुलाकडे मोटार सोपविल्याबद्दल त्याचे वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल आणि संबंधित दोन हॉटेलचे मालक, तेथील दोन व्यवस्थापकांवर पोलिसांनी सोमवारी गुन्हा दाखल केला. परंतु या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक झालेली नव्हती. दरम्यान, अपघातात मृत्यू झालेल्या दोघांचेही मृतदेह मध्य प्रदेशातील मूळ गावी नेण्यात आले.

अशी टाळली पोलिसांनी आरोपीची कोठडी

कल्याणीनगरमध्ये अपघात झाल्यावर संबंधित अल्पवयीन मुलाला जमावाने चोप दिला होता. अशा घटनांत एरवी पोलिस संबंधित युवकाला शासकीय रुग्णालयात दाखल करतात. तेथे उपचार पूर्ण झाल्यावर त्याला अटक करतात आणि त्यानंतर न्यायालयात हजर करतात. कल्याणीनगरच्या घटनेत संबंधित युवकाला पोलिसांनी दुपारी बारानंतर अटक केली असती तर त्याला रविवारचा दिवस पोलिस कोठडीत राहावे लागले असते आणि सोमवारी न्यायालयात हजर करावे लागले असते.

पोलिस कोठडीत राहण्याची त्या मुलावर वेळ येऊ नये म्हणून जुजबे प्रथमोपचार करून तत्परतेने त्याला सुट्टीच्या न्यायालयात हजार करण्यात आले. कलमेही जामीनपात्र असल्याने त्याला सहज जामीन मिळाला. या सगळ्या घटनाक्रमाबद्दल राज्यातील नागरिकांत संतापाची लाट उसळली. सोशल मीडियावरही त्याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पोलिस आयुक्तांना कडक कारवाई करण्याचा आदेश द्यावा लागला.

मार्चपासून मोटार नोंदनीविना

ही अलिशान मोटार अग्रवाल यांनी बंगळुरूमधून सुमारे तीन कोटी रुपयांना मार्च महिन्यात खरेदी केली. तात्पुरत्या नोंदणीवर ती मोटार पुण्यात आणली. येथे आल्यावर त्यांनी तातडीने परिवहन कार्यालयात नोंदणी करणे गरजेचे होते. परंतु अग्रवाल यांच्याकडून अद्याप नोंदणी झालेली नाही. त्यामुळे त्या मोटारीला नंबर मिळालेला नाही. याबाबतच्या मुद्द्यांची पोलिसांनी दखल घेतली असून, त्यांच्यासमवेत आम्हीही कारवाई करू, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com