
Pune News : प्रलंबित रस्त्याचा प्रश्न मार्गी, निंबाळकरवाडीतील घटना; गावकऱ्यांचा पुढाकार
katraj - नव्याने महापालिकेत समाविष्ट गावातील निंबाळकरवाडी गावठाणातील अनेक वर्षापासून असलेला प्रलंबित रस्त्याचा प्रश्न गावकऱ्यांच्या पुढाकाराने मार्गी लागला आहे. गावठाणांतून समर्थगड, सरहद संस्थेकडे जाणारा हा रस्ता अत्यंत अरुंद होता. या रस्त्यावरून एकच चारचाकी मोटार जाणे शक्य होते.
तसेच हा रस्ता सुरवातीला चढाचा असल्याने अपघाताची शक्यता होती. त्यामुळे हा रस्ता होणे गरजेचे होते. अशावेळी गावकऱ्यांनी पुढाकार घेत स्वतःची जागा सोडत हा रस्ता रुंद करुन घेतला आहे.
आठ ते दहा फूट रस्ता असणारा हा रस्ता आता २० ते २२ फूट रुंद होणार आहे. रस्त्यावरून चारचाकी वाहन जाणे कठीण होते. मात्र, हा रस्ता वाढविण्यात आल्याने वाहनचालकांना मार्ग सोयीचा झाला आहे. त्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनचालकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. किमान अर्ध्या किलोमिटरवरील गावातील गावकऱ्यांची घरे पाडण्यात आली आहेत.
यामध्ये १४ ते १५ जागा मालकांनी आपली जुनी कच्ची-पक्की घरे स्वतःच्या स्व-इच्छेने पाडण्यास परवानगी दिली. हा रस्ता रुंदीकरण करण्यासाठी माजी उपसरपंच अजित निंबाळकर, संतोष बालवडकर, रामदास खोपडे, किरण निंबाळकर यांनी पुढाकार घेऊन सहकार्य केले.
यामध्ये प्रामुख्याने अमोल निंबाळकर, एकनाथ भाटे, आबासाहेब आखाडे, तानाजी निंबाळकर, सतीश निंबाळकर, दिलीप निंबाळकर, काशिनाथ भाटे, मनेश सणस, दत्ता सणस, पांडुरंग बालवडकर, अनिल निंबाळकर, हौसाबई निंबाळकर, सनी निंबाळकर, कैलास निंबाळकर, निर्मल डांगी या जागामालकांनी कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता रस्त्यासाठी जागा सोडली आहे.
प्रतिक्रिया
अनेक वर्षापासून रस्ता अरुंद असल्याने याठिकाणी अडचण होत होती. तसेच अपघाताची शक्यता असल्याने रस्ता रुंदीकरण करणे गरजेचे होते. यावेळी आम्ही पुढाकार घेऊन रस्त्यात जागा येणाऱ्या प्रत्येक जागा मालकाला जागा सोडून रस्ता मोठे करणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले. जागामालक तयार झाल्यानंतर आम्ही रस्ता करून घेण्याचे काम सुरु केले आहे. आता जवळपास हा रस्ता २० फूट रुंद झाला आहे
- अजित निंबाळकर, माजी उपसरपंच, गुजर-निंबाळकरवाडी