
पुणे : खडकवासल्यात 'पाणी-कचऱ्याचे' नियोजन बिघडले
किरकटवाडी : मागील काही दिवसांपासून खडकवासला गावातील पाणीपुरवठा अनियमित व कमी दाबाने होत आहे. तसेच कचऱ्याची गाडीही अनियमित वेळेत येत असल्याने नागरिक पालिका प्रशासनाच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. किमान पाणीपुरवठा व कचरागाडीचे नियोजन तरी व्यवस्थित व्हावे अशी मागणी नागरिक करत आहेत.
खडकवासला गावाला खडकवासला धरणातून पाणीपुरवठा होतो. गावात धरण असताना गावातीलच नागरिकांना पाण्यासाठी तरसावे लागत असल्याचे चित्र आहे. कोल्हेवाडी परिसरात अत्यंत कमी दाबाने व कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्याचे टँकर विकत घ्यावे लागत आहेत. तसेच कचऱ्याचे नियोजनही मागील काही दिवसांपासून बिघडले आहे. कचरागाडी सकाळी न येता दुपारी किंवा संध्याकाळी येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याबाबत योग्य नियोजन करून गैरसोय टाळण्याची मागणी माजी सरपंच सौरभ मते यांनी केली आहे.
"मागील सुमारे महिनाभरापासून अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. कचरा गाडीही अवेळी येत असल्याने गैरसोय होत आहे. काही बिघाड झाल्यास आठ ते दहा दिवस दुरुस्तीसाठी लागत असतील तर ग्रामपंचायतीचा कारभार पालिकेपेक्षा कित्येक पटीने चांगला होता असं म्हणण्याची वेळ आली आहे." विकास धावडे, नागरिक,कोल्हेवाडी खडकवासला.
"सरासरीपेक्षा खूप कमी प्रमाणात सध्या पाणीपुरवठा केला जात आहे. परिणामी टॅंकरने विकत पाणी घ्यावे लागत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने किमान पुरेसा पाणीसाठा होईल असे नियोजन संबंधित विभागाने करणे आवश्यक आहे." प्रणिता वांजोळे, नागरिक, खडकवासला.
"पाणीपुरवठ्याची मोटार नादुरुस्त झाल्याने काही दिवस अडचण निर्माण झाली होती. दुरुस्तीचे काम झाल्याने सध्या पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. सर्व भागांना सरासरी एक तास पाणी सोडण्यात येत आहे." सचिन गावडे, कनिष्ठ अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे मनपा.
"कचऱ्याच्या दोन्हीही गाड्या नादुरुस्त झाल्याने दुसऱ्या गाड्या मागविण्यात आल्या होत्या. त्या गाड्या दुपारनंतर उपलब्ध होत असल्याने सकाळच्या वेळेत कचरा गोळा करणे शक्य होत नव्हते. एक गाडी दुरुस्त झाली असून दुसरीही गाडी लवकरच मिळेल. येत्या सोमवारपासून नियमितपणे सकाळच्या वेळेत कचरा गाड्या येतील." रुपेश मते, आरोग्य निरीक्षक, सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालय, पुणे मनपा.
Web Title: Pune Khadakwasala Water Waste Planning Failed Citizen Basic Amenities Demand
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..