esakal | महिलांना आता इतर क्षेत्रांप्रमाणे लष्करात ही नव्या संधी - कमांडर ब्रिगेडियर आर. के. गायकवाड
sakal

बोलून बातमी शोधा

army

महिलांना आता इतर क्षेत्रांप्रमाणे लष्करात ही नव्या संधी

sakal_logo
By
अक्षता पवार - सकाळ वृत्तसेवा

पुणे : ‘‘महिलांना आता इतर क्षेत्रांप्रमाणे लष्करात ही नव्या संधी मिळत आहेत. तर गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आता महिला उमेदवारांनाही एनडीएमध्ये प्रशिक्षण घेता येणार आहे. एनसीसीमध्ये ३३ टक्के मुली आहेत व त्यांना एनसीसीमार्फत प्रथमिक प्रशिक्षण दिले जाते. लष्करात दाखल होताना वेगवेगळ्या संरक्षण प्रशिक्षण संस्थेत त्यांना एनसीसीच्या प्रशिक्षणाचा नक्कीच फायदा होणार आहे. असे पुणे एनसीसी ग्रुप कमांडर ब्रिगेडियर आर. के. गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा: 'या' ई-मेल शिष्टाचाराचे करा पालन! व्यक्तिमत्त्वाचा वाढेल प्रभाव

ब्रिगेडियर गायकवाड यांनी नुकतेच पुणे एनसीसी ग्रुप कमांडरचे पदभार स्वीकारले आहे. याच अनुषंगाने त्यांनी ‘सकाळ’शी संवाद साधला. गायकवाड म्हणाले, ‘‘एनसीसीच्या विविध कॅम्प, क्रिडा व कला स्पर्धांमध्ये सहभाग घेत मुली देखील उत्तम कामगिरी करत आहेत. त्यामुळे लष्करात मुलींचा सहभाग वाढेल. एनसीसीतून प्रशिक्षण घेणारे कित्येक कॅडेट्स आज लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तरुणाईला लष्करात जाण्यासाठी प्रोत्साहन करण्याबरोबर देशाचे चांगले नागरिक घडविण्याचा प्रयत्न एनसीसीच्या माध्यमातून केला जात आहे. तर पुणे एनसीसी ग्रुपसाठी येत्या काळात नवनवीन उपक्रम राबविण्यात येणार आहेत.’’

ब्रिगेडियर गायकवाड हे मुळचे सातारा येथील रहिमतपूर या गावाचे आहेत. त्यांनी कुपर इंग्लिश स्कूल आणि सातारा सैनिक शाळेतून आपले प्रशिक्षण पूर्ण केले. शालेय प्रशिक्षण घेत असतानाच त्यांनी एनसीसीमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर ते पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) दाखल झाले. तसेच पुढील प्रशिक्षण त्यांनी देहरादूनच्या इंडियन मिलिटरी ॲकॅडमीतून पूर्ण केले व लष्करात रुजू झाले. आपल्या ३५ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी जम्मू काश्मीर, ईशान्य भारत, वाळवंटी प्रदेशातील सीमेवर जबाबदारी पार पाडली. पुणे एनसीसी ग्रुप कमांडर पदाची सूत्रे हाती घेण्यापूर्वी ते गुजरातच्या वल्लभ विद्यानगर एनसीसी ग्रुपचे कमांडर होते. त्यांचा एनसीसी सेवेतील हा तिसरा कार्यकाल आहे.

हे करण्यावर भर

- लष्करातील विविध संस्थांमध्ये एनसीसी कॅडेट्सची निवड व्हावी यासाठी त्यांना तयार करणे

- तरुण मुला मुलींना शिस्त आणि एकतेचे धडे दिले जाते

- एनसीसी कॅडेट्सला लष्करात जाण्यासाठी थेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्डाच्या (एसएसबी) मुलाखतींचे ऑनलाइन प्रशिक्षण

- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेसाठीची (यूपीएससी) तयारी

loading image
go to top