Pune : नांदोशी, किरकटवाडी परिसरात बिबटे दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बिबट्या दिसल्याने नागरिकांत घबराट

Pune : नांदोशी, किरकटवाडी परिसरात बिबटे दिसल्याने नागरिकांमध्ये घबराट

किरकटवाडी : सिंहगड रस्त्याला लागून असलेल्या नांदोशी व किरकटवाडी या गावांमध्ये एकाच दिवशी दोन बिबट्यांचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. याबाबत माहिती मिळताच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करुन नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

नांदोशी व किरकटवाडी गावच्या शिवेवर असलेल्या खोराडी परिसरात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरुन दोन बिबटे जाताना वाहनचालकांना दिसले. तसेच पहाटे किरकटवाडी येथील माळवाडी परिसरात एका गोठ्याच्या मागच्या बाजूला दोन बिबटे बसलेले एका रहिवाशाने पाहिले. परिसरात बिबटे दिसल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्याने याबाबत नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

नांदोशीचे माजी सरपंच राजाराम वाटाने यांनी भांबुर्डा वन परिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांना बिबटे दिसल्याबाबत माहिती दिल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने येऊन पाहणी केली आहे व नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच बिबट्या पासून बचाव करण्यासाठी महितीदर्शक फलकही लावण्यात आले आहेत.

नांदोशी व किरकटवाडी या गावांना लागून जंगलाचा परिसर आहे. यापूर्वीही या भागात बिबटे दिसून आले आहेत. आजपर्यंत या भागात बिबट्याने नागरिकांवर हल्ला केल्याची एकही घटना घडलेली नाही. नागरिकांनी रात्रीच्या वेळी जंगलात जाणे टाळावे. तसेच जनावरांनाही रात्रीच्या वेळी सुरक्षीत ठिकाणी बांधावे. बिबट्या दिसून आल्यास तात्काळ वन विभागाशी संपर्क साधावा.

प्रदीप संकपाळ, भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी.