esakal | Pune : अशी करू या घरगुती गणेशोत्सवाची तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : अशी करू या घरगुती गणेशोत्सवाची तयारी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : नोकरी-व्यवसायात रोजचा बराच वेळ जाणाऱ्या महिला किंवा पूजेच्या तयारीचा फारसा अनुभव नसलेल्या तरुणींची आयत्या वेळी धांदल उडण्याची शक्यता असते. पुण्यातील विद्या खेर या ज्येष्ठ, जाणत्या गृहिणीने यासाठी मोलाच्या सूचना केल्या आहेत. ‘‘पूर्वनियोजित तयारी करून ठेवल्यास, उत्सवाचा आनंद निश्चिंतपणे घेता येतो, आयत्या वेळची धावपळ टळते,’’ या मुद्द्यावर त्यांनी भर दिला.

विद्याताई म्हणाल्या, ‘‘नोकरी-व्यवसायाच्या दगदगीत बऱ्याच महिलांना पुरेसा वेळ मिळत नाही. कित्येक गृहिणीही बऱ्याच व्यापात असतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या तयारीत काही तरी राहून जाऊ शकतं. मग प्रत्यक्ष पूजेच्या वेळी धावपळ करावी लागू नये, यासाठी पूर्वनियोजन महत्त्वाचं ठरतं. बाहेरून आणायच्या जिन्नसांची एक यादी व घरातील आवश्यक त्या कामांची, अशा दोन याद्या करून ठेवणं फार सोयीचं जातं.

आधीच तयार केलेल्या या याद्यांनुसार एक एक काम हातावेगळं करत जावं. बाहेर जाताना नेलेल्या यादीनुसार सामग्री पुरेशी अगोदरच आणून ठेवावी. उत्सवकाळात पूजेसाठी लागणारी फळं व फुलं रोज ताजी उपलब्ध करण्याचं नियोजनही आवर्जून करावं.’’

विद्याताईंनी सांगितले की, पूजेसाठी सुमारे वीस ते पंचवीस वस्तू लागतात. हळद, कुंकू, गंध, अक्षता, शेंदूर, कापूर, धूप, अत्तर, उदबत्ती, दोन समया, दोन निरांजनं, कलश, पळी, भांडं, ताम्हन, आरती संग्रहित केलेलं पुस्तक, शंख, घंटा, चौरंग, पाट, आसन, नॅपकिन आदी साहित्य आधी एकत्र करून ठेवल्यास उपयोग होईल. प्रत्यक्ष पूजेच्या थोडं आधी पंचामृत तयार करून ठेवावं. त्यात दही, तूप, मध, साखर हे घटक प्रत्येकी एक चमचा असल्यास दूध चार चमचे, या प्रमाणात घालावं.

नैवेद्यासाठी गूळ व खोबरं वाटीत काढून ठेवावं. निरांजनांसाठी तूप व समयांसाठी तेल तसंच कापसाच्या वाती सज्ज ठेवाव्यात. रांगोळी, काड्यापेटी, कापसाची वस्त्रं, काही सुटी नाणी आदीही तयार ठेवावीत. विड्याची पानं, पंधरा सुपाऱ्या, पत्री, फुलं, दूर्वाही हव्यात. टोपी किंवा फेटा वगैरेची व्यवस्था ठेवल्यास पारंपरिकता जपता येईल.

पूजेच्या सामग्रीत निसर्गाचे विविध घटक असतात. ही सर्व तयारी करताना स्थल, काल, परिस्थितीनुरूप काही वस्तू कमी कराव्या लागल्या तर जमवून घ्यावं. गणेशोत्सव हा आनंदोल्लासाची पखरण करणारा आहे. प्रसन्न असणं, मिळून मिसळून उत्सव साजरा करणं, याला अपार महत्त्व आहे.

loading image
go to top