
पुणे : तब्बल २८ वर्षांनंतर पुणे-लोणावळा रेल्वेच्या तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेला राज्य सरकारच्या पायाभूत समितीने मंजुरी दिली आहे. लवकरच राज्याच्या मंत्रिमंडळाचीदेखील याला मंजुरी मिळणार आहे. ‘एमआरव्हीसी’ने (मुंबई रेल विकास कॉर्पोरेशन) याचा सुधारित सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) राज्य सरकारला सादर केला होता. हा ६३ किलोमीटरचा मार्ग असून दोन अतिरिक्त मार्गिका टाकण्यासाठी ५ हजार १०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. राज्य व केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्यानंतरच या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. मात्र त्यासाठी आणखी किमान सहा महिन्यांची प्रतीक्षा करावी लागेल.