esakal | Pune : महालक्ष्मी मंदिरात उद्यापासून कार्यक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

Mahalaxmi Mandir

पुणे : महालक्ष्मी मंदिरात उद्यापासून कार्यक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्टच्यावतीने आयोजित शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ गुरुवारपासून (ता. ७) होणार आहे. ७ ते १५ ऑक्टोबरदरम्यान धार्मिक कार्यक्रमांसोबतच विविध क्षेत्रात कर्तृत्ववान महिलांचा सन्मान, पोलिस खात्यातील महिलांचा सन्मान, कन्यापूजन, वीरमाता-पत्नींचा गौरव होणार आहे. कोरोनामुळे यंदाचा नवरात्रोत्सव महालक्ष्मी मंदिरात साध्या पद्धतीने साजरा होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे प्रमुख विश्‍वस्त अमिता अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.

गुरुवारी सकाळी ९.३० वाजता ट्रस्टच्या प्रमुख विश्‍वस्त अग्रवाल यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. तसेच, सायंकाळी ७ वाजता मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन व पहिली आरती पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या हस्ते होईल. याशिवाय दहा दिवसात श्री सुक्त अभिषेक, श्री महालक्ष्मी महायाग, श्री दुर्गासप्तशती महायाग, सुप्रभातम् अभिषेक आदी कार्यक्रम होतील.

हेही वाचा: मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

अग्रवाल म्हणाल्या, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरध्वनीद्वारे संवाद साधलेल्या परिचारिका छाया जगताप तसेच, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सोनिया अग्रवाल-कोंजेटी, पल्लवी जैन यांचा गौरव होणार आहे. रविवारी (ता. १०) सकाळी नऊ वाजता ऑनलाइन पद्धतीने श्री सुक्त पठण कार्यक्रम होईल. यामध्ये पुण्यातील विविध शाळांमधील १४ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत.’’ श्री महालक्ष्मी मंदिराच्या www.mahalaxmimandirpune.org या वेबसाइटवरून तसेच, फेसबुक पेज व युट्यूब आणि स्थानिक केबलवर जास्तीत जास्त भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. पत्रकार परिषदेला विश्‍वस्त नगरसेवक प्रवीण चोरबेले, अ‍ॅड. प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल उपस्थित होते.

loading image
go to top