मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rain update

मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता

पुणे : राज्यात पुढील चार दिवस मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. सध्या बंगालच्या उपसागर व परिसरावर चक्राकार वारे सक्रिय आहेत. तसेच तमिळनाडू किनाऱ्यापासून केरळ पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टी ही सक्रिय आहे. परिणामी दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील काही भागात जोरदार पाऊस पडेल.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. सोमवारी (ता. ४) मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. सध्या दिवसा ऊन आणि रात्री विजांच्या कडकडाटासह पावसाचे चित्र दिसून येत आहे. तर मंगळवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची नोंद झाली. तसेच येत्या ९ ऑक्टोबरपर्यंत राज्यातील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल.

शहरात सोमवारी सायंकाळनंतर पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. विविध ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने, झाडे पडल्याने नागरिकांना अडचणी निर्माण झाल्या. मात्र मंगळवारी सकाळी पुन्हा सर्वत्र ऊन कायम होते. तसेच काही भागात दुपारनंतर हलक्या सरींनी हजेरी लावली. पुढील आठवडाभर शहर व परिसरात अंशतः ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर घाट माथ्यावर पुढील चार दिवस तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

परतीचा मॉन्सून

नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) यांचा देशातील कालावधी पूर्ण झाला असून परतीच्या मॉन्सूनसाठी आता पोषक हवामान निर्माण झाले आहे. तर बुधवारपासून (ता.६) वायव्य भारताच्या काही भागातून सुरू होण्याची शक्यता आहे. यंदा मॉन्सूनने सर्वसाधारण वेळेपेक्षा काहीशा उशिराने संपूर्ण देश व्यापला होता. त्याच प्रमाणे आता मॉन्सूनच्या परतीचा मुहूर्तही देखील काहीसा लांबला.