
Pune News: पहाडदऱ्यातील निखील वाघ याची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याकडून निवड
पारगाव : पहाडदरा आंबेगाव येथील सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील निखील मच्छिंद्र वाघ याची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी ७४ किलो वजन गटातून पुणे जिल्ह्याकडून निवड झाली असून आंबेगाव तालुक्यातून प्रथमच निखिल वाघ याची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल त्याचे आंबेगाव तालुक्यातून कौतुक होत आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील डोंगराच्या कुशीत वसलेल्या पहाडदरा या छोट्याश्या दुर्गम गावात जन्मलेल्या निखिलचे लहान पणापासून कुस्तीची आवड पाहून त्याचे वडील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मच्छिंद्र वाघ यांनी त्यास कुस्तीचे शास्त्रशुध्द प्रशिक्षण मिळावे म्हणून त्यास भोसरी येथील महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फोंडेशन मध्ये वस्ताद किसनराव लांडगे व रुपेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली निखिलचा सराव सुरु आहे.
नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा निवड चाचणी स्पर्धेत पुणे जिल्ह्यातून ७४ किलो वजन गटातून निखील याची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. २०१९ साली कुमार महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुणे जिल्ह्याला दुसरा क्रमांक ( रौप्य पदक ) मिळवून देऊन आंबेगाव तालुक्याला कुस्तीमध्ये तब्बल ६३ वर्षा नंतर पदक मिळवून दिले होते.