'शरद पवार यांच्यामुळे राजकीय पुनर्जन्म'

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 November 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीदिनी माझा राजकीय पुनर्जन्म झाला असल्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी (ता. २८) पुण्यात सांगितले.

पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे महात्मा जोतिराव फुले यांच्या पुण्यतिथीदिनी माझा राजकीय पुनर्जन्म झाला असल्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी गुरुवारी (ता. २८) पुण्यात सांगितले. यामुळे मी शरद पवार, समता परिषदेचे कार्यकर्ते आणि येवल्याचे मतदार यांचे आभार मानत असल्याचेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. या वेळी भुजबळ प्रचंड भावुक झाले होते. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दिला जाणारा महात्मा फुले समता पुरस्कार आज भुजबळ यांच्या हस्ते ९३ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना प्रदान  करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. 

या वेळी मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, बापूसाहेब भुजबळ, माजी आमदार कमल ढोले पाटील, पंकज भुजबळ, प्रा. हरी नरके, मंजिरी धाडगे, मनीषा लडकत, आरती कोंढरे, वैशाली बनकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. 

महापौर मुरलीधर मोहोळ आणि उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी सकाळी दहाला समता भूमीतील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत अभिवादन  केले.           

या वेळी डॉ. सबनीस, हरी नरके, नागेश गवळी यांनीही मनोगत व्यक्त केले. भुजबळ यांनी कार्यक्रमाच्या प्रारंभीच महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत, अभिवादन केले. या वेळी भुजबळ यांच्या हस्ते कुमार आहेर यांनी लिहिलेल्या ‘मी बुद्धमय संत तुकाराम’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. समता परिषदेचे कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ यांनी प्रास्ताविक केले. विजयकुमार लडकत यांनी सूत्रसंचालन केले. प्रीतेश गवळी यांनी आभार  मानले. 

मी कारागृहात असताना समता परिषदेचे सर्व कार्यकर्ते हे माझ्या आणि माझ्या कुटुंबीयांच्या पाठीशी पहाडासारखे उभे राहिले आणि मला धैर्य दिले. यामुळे या कार्यकर्त्यांचे, येवला मतदारसंघातील मतदारांनी पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवला आणि प्रचंड मतांनी पुन्हा आमदार केले आणि शरद पवार यांनी पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी देऊन, माझा राजकीय पुनर्जन्म केला आहे. त्यामुळे या सर्वांचे मी आभार मानतो. 
- छगन भुजबळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Mahatma Phule samta Award