Pune : या उन्हाळ्यात तरी पाणी मिळेल का ? मांजरीकरांनी व्यक्त केले नैराश्य

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून मांजरी बुद्रुक येथील पाणीपुरवठा
water
water sakal

मांजरी : प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागात ताळमेळ व नियोजन नसल्याने येथील पाणीपुरवठा योजना आजूनही पूर्णत्वास आलेली नाही. या महिन्यात होईल, पुढच्या महिन्यात होईल, असे म्हणता म्हणता ही योजना मृगजळाप्रमाणे लांबतच चालली आहे. त्यामुळे या उन्हाळ्यात तरी योजनेचे पाणी अंगणात येईल की नाही, याबाबत नागरिकांनी शंका व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून मांजरी बुद्रुक येथील पाणीपुरवठा योजनेचे काम साडेचार वर्षापासून सुरू आहे. सुरूवातीला निधीची कमतरता, विविध खात्याच्या परवानग्या, राजकीय अनास्था, श्रेयवाद आणि प्रशासनाच्याच विविध विभागाकडून होणारी कोंडी यामुळे योजनेचा प्रवास आजही अडखळतच सुरू आहे. सुरूवातीला लष्कर हद्दीतून वाहिनीच्या परवानगीसाठी दोन अडीच वर्षे गेली. त्यानंतर वाहिनी ओलांडण्यासाठी एरिगेशन, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या परवानगीसाठी, नंतर विजजोडसाठी प्रतिक्षा करावी लागली. सध्या लक्ष्मीकॉलनी येथे असलेल्या योजनेच्या शुध्दीकरण केंद्रापासून कवडीपाट टोलनाक्यापर्यंत सुमारे साडेचार किलोमीटर लांबिच्या वाहिन्या टाकण्यासाठी महामार्ग प्राधिकरणकडे निधीअभावी काम रखडले आहे. गाव पालिकेत गेल्याने हस्तांतरण प्रक्रियाही रखडली आहे. त्यामुळे नागरिकांच्या दारात पाणी पोहचण्यासाठी आजून किती वेळ लागेल याची शाश्वती नाही.

याशिवाय योजनेच्या सुरूवातीला मांजरी-मुंढवा रस्त्यावर नागरिकरण नव्हते, आता या परिसरात मोठ्याप्रमाणात वसाहत वाढली आहे. त्यामुळे सुमारे पंचवीस किलोमीटर वितरिका वाढलेली आहे. त्यासाठी सुमारे पस्तीस कोटी रुपयांचे बजेट वाढले असून प्रस्ताव मंजूरीसाठी आहे. योजनेच्या अशा अडखळत वाटचालीमुळे या उन्हाळ्यात तरी पाणी मिळेल की नाही, असा प्रश्न रहिवाशांनी केला आहे.

"गाव पालिकेत समाविष्ट झाल्यानंतर संपूर्ण पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पालिकेकडून सध्या होणारा पाणीपुरवठा अत्यल्प आहे. महिना जातो तरी पाणी मिळत नाही. महिलांना त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी ही योजना लवकरात लवकर होणे गरजेचे आहे.'

सीमा घुले, गृहिणी

"आमची झांबरे वस्ती, मोरे वस्तीवर पाणी मिळतच नाही. डिसेंबर २०२१ पासून क्षेत्रीय कार्यालय व लष्कर पाणी पुरवठा केंद्र येथे समक्ष भेटून पत्र व्यवहार केला आहे. विविध कारणे सांगितली जातात. आम्ही कुणाकडे दाद मागायची तेच कळत नाही. पाणी योजनेची वाट पाहून थकलो आहोत.'

अरुण झांबरे, ग्रामस्थ

कालवा, हायवे क्रॉसिंग चे काम झाले आहे. विजजोड मिळेल. सोलापूर महामार्गालगत दोन्हीही बाजूने सुमारे साडेचार किलोमीटर वाहिनीला महामार्ग प्राधिकरणची परवानगी रखडली आहे. योजनेच्या वाढीव बजेटचा प्रस्ताव दिला आहे.

महादेव देवकर, अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

अशी आहे योजना

• योजनेचा सुरूवातीचा खर्च होता ४३ कोटी रुपये

• सध्या हा खर्च वाढून गेला आहे ७८ कोटी रूपयांवर

• मुख्य जलवाहिनीची लांबी सुमारे चौदा किलोमीटर

• अंतर्गत वितरण वाहिनीची पूर्वीची ५० किलोमीटर लांबी वाढून झाली आहे ७८ किलोमीटर

• जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता सुमारे १२ दशलक्ष लीटर

• गावाला मिळणार १० दशलक्ष लीटर पाणी

• साठवण टाक्या आहेत सहा, त्यांची साठवण क्षमता आहे २४ लाख लीटर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com