

पुणे, ता. २० ः परिवहन विभागाने राज्यातील रिक्षा व कॅबचालकांना मराठी अनिवार्य केले आहे. परिवहन आयुक्त यांच्या आदेशानंतर पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने आठ वायुवेग पथकाची नियुक्ती केली असून, त्यांच्यावर अमराठी रिक्षाचालकांचा शोध घेण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
गुरुवार (ता. २०) पासून ही मोहीम सुरू झाली असून, पहिल्याच दिवशी ९५ रिक्षाचालकांशी संवाद साधण्यात आला. यात १० रिक्षाचालक हे अमराठी आढळून आले. त्यांना आरटीओ प्रशासनाने नोटीस दिली असून, एक महिन्याच्या आत त्यांना व्यावहारिक मराठी बोलता येणे अनिवार्य करण्यात आले. जे दिलेल्या मुदतीतदेखील मराठी शिकणार नाहीत, त्यांच्यावर बॅज रद्दची कारवाई केली जाणार आहे.
पुणे शहरात सुमारे दीड लाख रिक्षाचालक असून, त्यापैकी अमराठी रिक्षाचालकांची संख्या सुमारे चार ते पाच हजार असण्याची शक्यता आहे. अमराठी रिक्षाचालकांची अधिकृत संख्या उपलब्ध नाही. त्यामुळे तपासणीदरम्यान मराठीचे ज्ञान नसलेल्या रिक्षाचालकांची स्वतंत्र नोंद केली जात आहे. याआधी पुणे आरटीओ कार्यालयाने ७२२ अमराठी रिक्षाचालकांना मराठीचे धडे दिले आहेत.
तपासणी, फिटनेस, परवाना नूतनीकरणावेळी चाचणी
रिक्षाचालकांना आपल्या वाहनाचे फिटनेस, परमीट नूतनीकरण करण्यासाठी आरटीओ कार्यालयात आल्यानंतर त्यांची मराठी भाषेविषयीची चाचणी घेतली जाणार आहे. त्यांना मराठीचे जुजबी ज्ञान नसल्याचे लक्षात आल्यावर त्यांनादेखील नोटीस दिली जाणार आहे. वायुवेग पथकाकडून शहरातील रिक्षाचालकांची तपासणी सुरू असून, मराठीचे ज्ञान नसलेल्या चालकांना टप्प्याटप्प्याने नोटीस बजावली जाणार आहे.
अमराठी रिक्षाचालकांना नोटीस बजावल्यानंतर त्यांनी त्या तारखेपासून एका महिन्याच्या आत मराठीचे व्यावहारिक ज्ञान अवगत करणे अनिवार्य आहे. त्यांची चाचणी होईल. चाचणीत उत्तीर्ण झाल्यावर त्यांना प्रमाणपत्र दिले जाईल. जर चाचणीत नापास झाले तर त्यांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला जाईल.
- स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.