esakal | Sakal Impact: विद्युतदाहिनीच्या चिमणीतील धूर थांबणार; सकाळच्या बातमीची पुणे महापौरांकडून दखल
sakal

बोलून बातमी शोधा

विद्युतदाहिनीच्या चिमणीचा धूर थांबणार; पुणे महापौरांकडून दखल

विद्युतदाहिनीच्या चिमणीचा धूर थांबणार; पुणे महापौरांकडून दखल

sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे : पुणे शहर आणि जिल्हा कोरोनाने बाधित जिल्ह्यांपैकी सर्वांत आघाडीवर असलेला जिल्हा आहे. पुण्यातील परिस्थिती फारच विदारक आहे. या मृतांचे विद्युत दाहिनीतून अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. मात्र, योग्य व्यवस्थापनाअभावी स्मशानभूमीच्या विद्युत दाहिनीच्या चिमणीतून येणारा काळाकुट्ट धूर आणि राख थांबवण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही. त्यातून होणाऱ्या प्रदुषणाबाबत तसेच महापालिकेच्या चुकीच्या प्राधान्यक्रमाबाबत आता ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांनी फेसबुक पोस्टद्वारे टीका केली होती. त्यांच्या या टीकेची दखल 'सकाळ'ने घेतली होती आणि त्यांच्या योग्य मुद्याला प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले होते. 'सकाळ'च्या या बातमीचा इम्पॅक्ट झाला असून आता यासंदर्भात पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्वत: याप्रकरणी लक्ष घातलं आहे.

हेही वाचा: पुण्यात आज ८४ ठिकाणी होणार लसीकरण

हेही वाचा: पुणे रेल्वेच्या १५ गाड्या रद्द

वैकुंठ स्मशानभूमीतील चिमणीद्वारे बाहेर पडणाऱ्या धुराबाबत डॉ. विश्वंभर चौधरी यांनी काही बाबी महापालिकेच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्याच पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी डॉ. चौधरी व नागरीकांसह वैंकुठ स्मशानभूमी परिसराची पाहणी करुन आढावा घेतला. याबाबत मोहोळ यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, '' या वैंकुठ स्मशानभूमी संदर्भातील त्रुटी तातडीने दूर करुन, आवश्यकतेनुसार उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच 'निरी’या शासकीय संस्थेमार्फत या विषयी 'ऑडिट' करण्याच्या सूचना दिल्या आहेच. येथील बाकी काही दुरुस्तीची कामे सुद्धा तातडीने पूर्ण करण्याच्याही सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.''

यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार, आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी नितीन शिंदे, नगरसेवक श्री. धीरजजी घाटे, नगसेविका सरस्वतीताई शेंडगे, स्मिताताई वस्ते, रघुनाथ गौडा आदी उपस्थित होते.

हेही वाचा: 'विद्युतदाहिनीतील राख थांबवण्यासाठी पुणे महापालिकेच्या उपाययोजना काय?'

काय म्हटलं होतं विश्वंभर चौधरी यांनी?

विश्वंभर चौधरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की, सकाळी साडे सहा वाजता आमच्या इमारतीच्या गच्चीवरून केलेलं हे शूटिंग आहे. वैकुंठ स्मशानभूमीच्या विद्युत दाहिनीच्या चिमणीतून काळाकुट्ट धूर बाहेर येतोय. चिमणीची रूंदी तर कमी आहेच पण धूरासोबत जी राख बाहेर पडते ती थांबवण्यासाठी कोणतीही उपाययोजना नाही. परिणामी ही राख नवी पेठ, सदाशिव, नारायण, कर्वे रोड भागातील इमारतींवर जाऊन थांबत असणार. खूप काही रॉकेट तंत्रज्ञान लागत नाही. उत्तम दर्जाचे fly ash arrestors कदाचित 15- 20 लाखांच्या बजेटमध्ये बाजारात उपलब्ध आहेत, जे पुणे महापालिकेसाठी अगदीच किरकोळ आहे. असं त्यांनी म्हटलं होतं. यासोबतच त्यांनी या धूराचा व्हिडीओ देखील फेसबुकवर पोस्ट केला होता.

संपूर्ण भारतात कोरोनाच्या विषाणूने हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेमुळे दिवसाला शेकडो मृत्यू होत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत (बुधवारी) कोरोनाच्या रुग्णांनी चार लाखांचा टप्पा ओलांडला आहे. तर जवळपास 4 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत देशात 4 लाख 12 हजार 262 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 3,980 जणांचा मृत्यू झाला आहे.