हत्याराचा धाक दाखवून व्यापाऱ्याला भरदिवसा लुबाडले, ४७ लाखांची रोकड लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

loot

Pune Crime : हत्याराचा धाक दाखवून व्यापाऱ्याला भरदिवसा लुबाडले, ४७ लाखांची रोकड लंपास

पुणे - चोरट्यांनी एका व्यापाऱ्याला मारहाण करून हत्याराचा धाक दाखवत ४७ लाखांची रोकड हिसकावून पोबारा केला. ही घटना नाना पेठेत गुरुवारी (ता. २३) सकाळी घडली. शहराच्या मध्यवस्तीत भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी मंगलपुरी भिकमपुरी गोस्वामी (वय ५५, रा. मंगळवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून समर्थ पोलिस ठाण्यात दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोस्वामी हे पन्ना एजन्सीमध्ये नोकरीस आहेत. ते नेहमीप्रमाणे दुकानातील व्यवसायाची रक्कम आणि धनादेश बॅंकेत जमा करण्यासाठी जातात.

गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास ते नाना पेठेतील रस्त्यावरून दुचाकीवर जात होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांना पाठीमागून धक्का देवून अडवले. गोस्वामी यांना मारहाण करून हत्याराने जीवे मारण्याची धमकी देत त्यांच्याकडील बॅग हिसकावून नेली. या बॅगमध्ये ४७ लाख २६ हजारांची रोकड आणि १४ धनादेश होते. या वेळी मारहाणीत फिर्यादी गोस्वामी हे जखमी झाले आहेत. दुचाकीवर आलेले चोरटे २५ ते ३० या वयोगटातील असून, तोंडाला मास्क लावलेला होता.

या घटनेची माहिती मिळताच पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त राजेंद्र डहाळे, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रमोद वाघमारे हे करीत आहेत.