पुणेकरांनो, उद्या जरा जपून; हवामान खात्यानं दिला 'ऑरेंज अलर्ट'

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

  • पुण्याला हवामान खात्याचा ‘आँरेंज अलर्ट’
  • शहर आणि परिसरात बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता, दरडी पडण्याचा इशारा

पुणे : पुणे शहर आणि परिसरात बुधवारी (ता. 5) पावसाच्या जोरदार सरी पडतील, असा इशारा भारतीय हवामान खात्याने मंगळवारी दिला. घाट माथ्यावर पावसाच्या सरींचा जोर वाढणार असल्याने शहर आणि परिसरात ‘आँरेंज अलर्ट’ दिला असल्याची माहिती खात्यातर्फे देण्यात आली. डोंगराळ भागात दरडी पडण्याच्या घटना घडतील, असेही खात्याने सांगितले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे महापालिकेने पाणी कपातीबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय!

शहर आणि परिसरात सोमवारी रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी पडत आहेत. मंगळवारी सकाळपासून पावसाचा हा जोर कायम होता. त्यामुळे संध्याकाळी साडेपाच वाजता प्रसिद्ध केलेल्या हवामान अंदाजात शहर आणि परिसरात बुधवारी जोरदार पावसाच्या सरी पडतील, असा इशारा दिला. तसेच, त्याच वेळी ‘आँरेंज अलर्ट’ही देण्यात आला. 

मुसळधार पावसाचा इशारा

शहर आणि परिसरातील काही भागात पुढील चोवीस तासांमध्ये पावसाच्या मध्यम सरी (15.6 ते 64.4 मिलीमीटर) पडतील. त्याच वेळी तुरळक ठिकाणी पावसाचा जोर वाढेल. तेथे मुसळधार (64.5 ते 115.5 मिलीमीटर) पाऊस पडेल. शहराच्या परिसरातील घाट भागात मात्र, मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याने दिला. तेथे 20.5 सेंटीमीटर म्हणजे 205 मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस कोसळेल, असे हवामान खात्याने दिलेल्या अंदाजात नमून केले आहे.

काय परिणाम होतील?

  • दृष्यमानता कमी होईल
  • रस्ते निसरडे होतील
  • नदी काठच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता
  • रस्त्याच्या कडेच्या झाडांच्या फांद्या पडण्याचा धोका
  • झाडे उन्मळून पडण्याची शक्यता
  • डोंगराळ भागात दरडी पडण्याचा धोका

हे करा

  • वाहनांचा वेग नियंत्रित ठेवा
  • नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये

 

(Edited by : Shivnandan Baviskar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune meteorological department's give orange alert about rain on wednesday