
पुणे : मेट्रो धावणार आणखी २१ कि. मी.
पुणे : शहर परिसरात येत्या डिसेंबर अखेरपर्यंत ३३. २९ किलोमीटर लांबीचे मेट्रो जाळे पूर्ण करण्याचे उदिष्टे महामेट्रोने निश्चित केले आहे. त्यापैकी आतापर्यंत ११.९७ किलोमीटर मार्गांचे काम पूर्ण झाले असून उर्वरित २१.३२ किलोमीटर लांबीचे काम पुढील दहा महिन्यात पूर्ण होणार आहे. त्यामुळे पुढील वर्षाच्या सुरूवातील पुणेकरांना संपूर्ण शहरात मेट्रोचा प्रवास करणे शक्य होणार आहे.
महामेट्रोकडून पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट आणि वनाज ते रामवाडी या दोन मेट्रो मार्गांचे काम सुरू केले आहे. त्यापैकी पिंपरी-चिंचवड ते फुगेवाडी हे ७.०६ किलोमीटर, तर वनाज ते गरवारे कॉलेज दरम्यानच्या ४.९१ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. रविवारी (ता. ६) रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या दोन्ही मार्गावरील मेट्रोचे उद्घाटन होणार आहे.
असा झाला मेट्रो प्रकल्पाचा प्रवास...
शहर परिसरात मेट्रोची चर्चा २००४ पासून सुरू होती. २००५-२००६ मध्ये वारजे जलशुद्धीकरण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी महापालिकेने मेट्रो प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन तत्कालीन केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केले. त्याची दखल तत्कालीन खासदार सुरेश कलमाडी यांनी घेतली आणि महापालिका स्तरावर मेट्रो प्रकल्पाची प्रक्रिया सुरू झाली. २००७च्या महापालिका निवडणुकीतही कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यात मेट्रोचा उल्लेख झाला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाला बूस्टर डोस दिला.
मेट्रो मार्ग दृष्टिक्षेपात
मेट्रोसाठी सुमारे ९८ टक्के भूसंपादनाचे काम पूर्ण शासकीय जागा
४१.९४ हेक्टर, तर खासगी जागा सुमारे १ हेक्टर
मार्चअखेर फुगेवाडी ते बोपोडी दरम्यान २.५० किलोमीटरचे काम पूर्ण होणार
एप्रिलअखेर गरवारे कॉलेज ते शिवाजीनगर न्यायालय २.३८ किलोमीटरचे काम पूर्ण होणार
पिंपरी चिंचवड ते फुगेवाडी ७.०६
वनाज ते गरवारे कॉलेज ४.९१
फुगेवाडी ते बोपोडी २.५०
बोपोडी ते रेंज हिल्स १.९५
गरवारे ते शिवाजीनगर न्यायालय २.३८
शिवाजीनगर न्यायालय ते बंडगार्डन ४.१६
रेंज हिल्स ते शिवाजीनगर न्यायालय (भूमिगत) २.४६
बंड गार्डन ते रामवाडी ४.२१
शिवाजीनगर न्यायालय ते स्वारगेट (भूमिगत) ३.६२
Web Title: Pune Metro Update 21 Km Work Completed Next Ten Months
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..