
एका तरुणाचा खून करून दहशत निर्माण करणाऱ्या सुशांत ऊर्फ मट्या शशिकांत कुचेकर याच्यासह टोळीतील आठजणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.
Pune Moka Crime : मट्या कुचेकरसह टोळीतील आठजणांवर मोका
पुणे - नाना पेठेतील राजेवाडी परिसरात एका तरुणाचा खून करून दहशत निर्माण करणाऱ्या सुशांत ऊर्फ मट्या शशिकांत कुचेकर याच्यासह टोळीतील आठजणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये एका महिलेसह अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे.
टोळीप्रमुख सुशांत ऊर्फ मट्या शशिकांत कुचेकर (वय २८, रा. नाना पेठ, राजेवाडी), आदित्य राजू केंजळे (वय १८, रा. खडक चौक, धायरी), स्वरूप संतोष गायकवाड (वय १८, रा. गुरूवार पेठ), राजन अरुण काऊंटर (वय २३, रा. राजेवाडी, नाना पेठ), तेजस अशोक जावळे (वय ३२, रा. नाना पेठ), अतिष अनिल फाळके (वय २७, रा. नाना पेठ) यांच्यासह एक ४४ वर्षीय महिलेस अटक करण्यात आली आहे. तर, एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून नाना पेठेतील राजेवाडी परिसरात जुन्या वादातून एका तरुणावर कोयत्याने वार करून आणि विटांनी मारहाण करून खून केला होता. तसेच, या परिसरात दहशत निर्माण केली होती. ही घटना २३ नोव्हेंबर २०२२ रोजी घडली होती. टोळीप्रमुख कुचेकर आणि त्याचे साथीदार आर्थिक फायदा मिळविण्याच्या उद्देशाने जबरी चोरी, खून, गुन्हा करण्यासाठी कट रचणे, नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करणे, बेकायदेशीर जमाव जमविणे असे गंभीर गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत.
यासंदर्भात समर्थ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश साठे यांनी पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांच्यामार्फत मोकाची कारवाई करण्याबाबत अतिरिक्त आयुक्त राजेंद्र डहाळे यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यांनी या प्रकरणाची छाननी करून कारवाईस मान्यता दिली. पुढील तपास फरासखाना विभागाचे सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर करत आहेत.