‘देवदूत’ कामगारांचा आज ‘रस्ता रोको’
लोणावळा, ता. २५ : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर अहोरात्र सेवा देणाऱ्या देवदूत कामगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून कर्मचारी आणि कुटुंबीयांच्या वतीने सोमवारी (ता. २६) कुसगाव कार्यालयाजवळील द्रुतगतीवर ‘रस्ता रोको’ आंदोलन करण्यात येणार आहे.
भारतीय मजदूर संघाचे चिटणीस बाळासाहेब भुजबळ यांनी याबाबत निवेदन दिले आहे. या आंदोलनानंतरही मागण्या मान्य न झाल्यास २७ जानेवारीपासून कामगारांचे कुटुंबीय कुसगाव ऑफिसजवळ बेमुदत उपोषणास बसणार आहेत. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीला राज्य रस्ते विकास महामंडळ, आयआरबी आणि आर्यन पंप लि. प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
कामगारांच्या प्रमुख मागण्या
आर्यन पंप्स अँड एन्व्हायरों सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या ‘देवदूत युनिट’मधील कामगारांना अल्प वेतनाऐवजी सन्मानजनक वेतन मिळावे आणि जादा कामाचे (ओव्हर टाइम) वेतन कायद्यानुसार दुप्पट दराने द्यावे. २०१५ ते २०१७ मधील ओव्हर टाइमचा मोबदला आणि मागील बोनसचा फरक त्वरित द्यावा. महामार्गावर काम करताना आवश्यक असणारी सुरक्षिततेची साधने पुरवण्यात यावीत. कामगार आणि त्यांच्या कुटुंबासाठी (आई-वडील, पत्नी व मुले) पाच लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी लागू करावी. द्रुतगती मार्गावरील क्यूआरव्ही व्हॅन सुस्थितीत नसल्याने ६० कामगारांचा जीव धोक्यात असून, वारंवार कळवूनही व्यवस्थापन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप भारतीय मजदूर संघाने केला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय सणांच्या सुट्ट्या न मिळणे, १२-१२ तास काम करूनही केवळ आठ तासांचेच वेतन मिळणे, अशा तक्रारी कामगारांनी केल्या आहेत.
---

