...तर शिवनेरी बसला ‘अच्छे दिन’ ! 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

खासगी बसचे दर एरवी एसटीच्या तुलनेत खूप कमी असतात. तसेच प्रवाशांना सुविधाही अधिक दिल्या जातात. या मार्गावर दर रचनेबाबत एसटीला उपाययोजना करणे शक्‍य आहे.

पुणे - बसमधील अस्वच्छता, ऑनलाइन आरक्षणातील त्रुटी, तिकीट दर आदी कारणांमुळे पुणे- मुंबई मार्गावरील शिवनेरी बसला उतरती कळा लागली आहे. ही बाब एका स्वयंसेवी संस्थेच्या सर्वेक्षणातून उघड झाली. शिवनेरी बससेवा पुन्हा लोकप्रिय होऊ शकते. मात्र, त्यासाठी नेमका आराखडा आणि ठोस उपाययोजनांची गरज असल्याचेही त्यात म्हटले आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मुंबईतील ‘बस फॉर अस फाउंडेशन’ संस्थेने सर्वेक्षण नुकतेच केले. सार्वजनिक वाहतुकीच्या प्रसारासाठी संस्था काम करते. ‘शिवनेरी’च्या सर्वेक्षणासाठी २००६ पासूनच्या सेवेचा संस्थेने आढावा घेतला. सलग आठ दिवस पुणे आणि मुंबईत पाहणी करून सर्वेक्षण केले. पुणे - मुंबई मार्गावर शिवनेरीच्या सध्या सुमारे १२५ बस धावत आहेत. सध्या दर अर्ध्या तासाला बस उपलब्ध आहे. ऑनलाइन तिकीट आरक्षित करणारे प्रवासी हिंजवडी, वाकड आदी ठिकाणी थांबतात. परंतु, नियोजित वेळेआधी दुसरी बस आली अन्‌ त्यात जागा असल्या तर, आरक्षण केलेल्या प्रवाशांना बसमध्ये बसू दिले जात नाही. तसेच हिंजवडीतून मुंबई, ठाणे, बोरिवलीसाठी थेट बस असावी, अशी मागणी आहे. त्यातील बोरिवली, ठाण्यासाठी एसटी बस काही काळ सुरू होत्या. परंतु, त्यात सातत्य नव्हते.

शिवनेरीऐवजी एशियाड बस सोडल्या जात असत. त्यामुळे अल्पावधीतच सेवा बंद पडली. तसेच पुरेशी प्रसिद्धी न झाल्यामुळे मुंबई- बंगळूर, पुणे- बंगळूर, कोल्हापूर- बंगळूर, मुंबई- नागपूर, पुणे- नागपूर, पुणे- चंद्रपूर, पुणे- पंढरपूर, बोरिवली- ठाणे- शिर्डी, पुणे- उदयपूर आदी मार्गांवरील शिवनेरी बससेवा अल्पावधीत बंद पडली. खासगी बसचे दर एरवी एसटीच्या तुलनेत खूप कमी असतात. तसेच प्रवाशांना सुविधाही अधिक दिल्या जातात. या मार्गावर दर रचनेबाबत एसटीला उपाययोजना करणे शक्‍य आहे. मात्र, त्याबाबत फारसा विचार झालेला नाही. तसेच एसटीच्या बसच्या प्रत्येक फेरीनंतर स्वच्छता होत नाही, ही बाब प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे.

सर्वेक्षणातील प्रमुख मुद्दे 
- खासगी बसच्या तुलनेत शिवनेरीत प्रवासी केंद्रित सुविधांचा अभाव 
- बसमधील अस्वच्छता (उदा : मळके पडदे, अस्वच्छ सीट, कचरा) 
- ऑनलाइन आरक्षणातील त्रुटींमुळे प्रवाशांची गैरसोय 
- शिवनेरीच्या मार्केटिंगमध्ये प्रशासन कमी पडले; त्यामुळे मार्ग बंद 
- प्रवाशांच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 
- खासगी वाहतूकदारांची तुल्यबळ सेवा, त्यांच्या वाहतुकीचा फटका 
- ओला- उबरची किफायत दरातील सेवा 

शिवनेरीच्या बस प्रत्येक फेरीनंतर स्वच्छ करण्यासाठी स्थानकांवर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच अन्य सुविधांबाबत प्रशासन आग्रही आहे. शिवनेरीबाबत प्रवाशांनी केलेल्या सूचनांची दखल एसटी महामंडळ नक्कीच घेईल आणि घेत आहे.
यामिनी जोशी, विभागनियंत्रक, एसटी महामंडळ, पुणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Mumbai Shivneri bus