esakal | ठेकेदारांनी काढले महापालिकेला वेड्यात!
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

ठेकेदारांनी काढले महापालिकेला वेड्यात!

sakal_logo
By
ब्रिजमोहन पाटील - सकाळ वृत्तसेवा

पुणे : महापालिकेकडून वाहनतळ भाड्याने घेताना ठेकेदारांनी करारात स्वतःच्या मूळ मिळकतींचा पत्ता चुकीचा देऊन प्रशासनाची दिशाभूल केली आहे. करार करताना कागदत्रांची व्यवस्थित तपासणी न केल्याने थकबाकी वसुलीसाठी मिळकत जप्ती किंवा बोजा चढविण्याच्या महापालिकेच्या प्रयत्नांना झटका बसला आहे.

गेल्या एका वर्षापासून वाहनतळाचे नियोजन वाहतूक विभागाकडे देण्यात आले आहे. यापूर्वी मालमत्ता व्यवस्थापन विभागाकडून याचे कामकाज पाहिले जात होते. याच विभागाने आत्तापर्यंत सर्व वाहनतळ भाड्याने देण्यासाठी निविदा काढणे, ठेकेदारांसोबत करार करणे ही कार्यवाही केली आहे. पण ठेकेदारांना फायदेशीर ठरतील अशा त्रुटी करारात ठेवल्याने आता डोकेदुखी वाढत चालली आहे. शहरातील ३० पैकी जवळपास सर्व वाहनतळांची मुदत संपत आली असून, गेल्या वर्षभरात एकही नव्याने करार झालेला नाही.

थकबाकी, नियमापेक्षा जास्त शुल्क वसुली, वाहनचालकांना सुविधा न देणे यामुळे ठेकेदारांवर कारवाई केली जाते. त्यासाठी ठेकेदाराने दिलेल्या पत्त्यावर त्यास नोटीस पाठवली जाते. मात्र, या ठेकेदारांकडून नोटिशीला उत्तर दिले जात नाही.

वाहनतळाच्या १६ ठेकेदारांची ५ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी वसूल होत नसल्याने वाहतूक नियोजन विभागाने मिळकतकर विभागाला या ठेकेदारांच्या मिळकतींचा शोध घेऊन त्यांच्यावर बोजा चढवावा किंवा त्यावर जप्ती करावी, असे पत्र दिले होते. पण त्यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केल्यानंतर महापालिकेचा ढिसाळ कारभार समोर आला आहे.

‘मिळकतकर’चा धक्कादायक अहवाल

वाहतूक नियोजन विभागाच्या पत्रानुसार मिळकतकर विभागाने विभागीय निरीक्षक व पेठ निरीक्षकांना ठेकेदाराने दिलेल्या पत्त्यावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून कारवाई करण्यास सांगितले होते. त्यावेळी १६ पैकी एका ठेकेदाराचे निधन झाले आहे, तर एकाचा खरा पत्ता सापडला असून त्या मिळकतीवर वाहतूक नियोजन विभागाने बोजा चढवावा, असे पत्र मिळकतकर विभागाने दिले आहे.

मिळकतकर विभागाने ठेकेदारांच्या मिळकतींचा शोध घेतला असता त्यांनी दिलेल्या पत्त्यावरील मिळकती दुसऱ्यांच्या नावावर असल्याचे समोर आले आहे. करार करताना चुकीची माहिती दिलेल्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून पुढील निविदांमध्ये त्यांना संधी दिली जाणार नाही. यापुढे करार करताना त्यांनी दिलेल्या पत्त्यावर जाऊन तपासणी करून केवायसी पूर्ण केला जाईल.

- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

अधिकाऱ्यांना धमक्या

मिळकतकर विभागाचे व वाहतूक नियोजन विभागाचे अधिकारी, कर्मचारी थकबाकी वसुलीसाठी, नोटीस देण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर गेल्यानंतर त्यांना तेथील नागरिकांकडून शिवीगाळ व धमक्या दिल्या जात आहेत. स्थानिक राजकारणीदेखील त्यांना पाठीशी घालतात. ज्या वाहनतळांची मोठी थकबाकी आहे, त्यास राजकीय हस्तक्षेपदेखील कारणीभूत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

  • ठेकेदारांनी पत्ता देताना अशी केली चलाखी

  • मूळ पत्ता न देता पत्रव्यवहारासाठी इतरांचा पत्ता दिला

  • करारात भाडेकरू असल्याचे दाखवून ती जागा आता सोडली

  • ज्या जुन्या वाड्यांचा पत्ता दिला ते वाडे पडल्याने तेथे कोणीही राहत नाही

  • पुणे कँटोन्मेंट हद्दीतील पत्ते दिल्याने तेथे जप्ती करता येत नाही.

  • महापालिकेच्या गवनि विभाचाच पत्ता दिल्याने तेथे कारवाई करता आली नाही

  • दोन ठेकेदारांनी झोपडपट्टी पुनर्वसनाच्या जागेचा पत्ता दिला तेथे सध्या बांधकाम सुरू आहे

loading image
go to top