Pune : काळेपडळ नेहरू पार्कमधील नागरिकांचा पालिका प्रशासनाविरोधात उद्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

Pune : काळेपडळ नेहरू पार्कमधील नागरिकांचा पालिका प्रशासनाविरोधात उद्रेक

हडपसर : काळेपडळ नेहरू पार्कमधील मस्जिद गल्लीमध्ये डेंगूने चार वर्षाच्या बालकासह तीन व्यक्तींचा बळी जाऊनही पालिका प्रशासन उपाययोजना राबविण्याबाबत गंभीर दिसत नाही. त्यामुळे येथील रहिवाशांनी प्रशासनाविरोधात घोषणा देत संताप व्यक्त केला आहे.

येथील नागरिकांना कित्येक वर्षांपासून सांडपाणी, पिण्याचे पाणी, कचरा, रस्ते आदी आरोग्याशी संबंधीत समस्यांशी दररोजच सामना करावा लागत आहे. कधी ड्रेनेजलाईन तुंबते, कधी पावसाचे पाणी घरात शिरते, कधी पिण्याचे पाणी येतच नाही तर, कधी या पाण्यात ड्रेनेजचे पाणी मिसळून दूषित पाण्याचा पुरवठा होत असतो. डासांचाही मोठ्याप्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. क त्यामुळे त्यांना कायमच आरोग्याच्या धोक्यात राहवे लागत आहे. पालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही सक्षम सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे वारंवार आजारांशी सामना करावा लागत असल्याची तक्रार शिवाजी पिरजादे, देविदास गायकवाड, प्रशांत गवळी, हाजी नूर अहमद,अशोक सरोदे, गणेश खारतोडे, आबा जाधव, प्रतिभा कुमावत सिंधु बंदला,सुनीता मांढरे, आसिफ शेख, सपना लोखंडे, जलील शेख यांच्यासह संतप्त महिला व नागरिकांनी केली आहे.

या गल्लीत वर्षभरापासून ड्रेनेज मिश्रित पाणी नळाला येत आहे, उखडलेले रस्ते, तुंबलेल्या ड्रेनेज लाईन, उघड्यावर असलेल्या वीज तारा याकडे अनेकदा मनपा प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचे लक्ष वेधूनही परिस्थिती बदलत नसल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत. आमच्याकडून पालिका कर घेते. काळे पडळला स्वच्छ पाणी येत असताना आम्ही मात्र ड्रेनेज मिश्रित पाणी पिऊन आरोग्याच्या समस्या सहन करीत आहोत. आता हेच घाण पाणी मनपा अधिकार्‍यांना पाजून त्यांना धडा शिकवू,' असा इशाराही येथील महिला व नागरिकांनी यावेळी दिला.

"येथील रहिवाशांना पूर्ण क्षमतेने सुविधा मिळत नाहीत. ड्रैनेज, पाणी व धोकादायक ओव्हरहेड विद्युत तारांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य दिले पाहिजे. सेलेना पार्क जलकुंभाचे काम होऊनही त्याचे पाणी अद्यापही परिसरातील नागरिकांना मि।त नाही. याबाबत आमदार व खासदारांना लक्ष घालण्यासाठी आपण सांगितले आहे. प्रशासनाने त्वरित लक्ष घातले नाही तर नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागेल.'

फारूख इनामदार, माजी नगरसेवक

"येथील समस्येंबाबत त्या त्या विभागाला वेळोवेळी सूचना दिलेल्या आहेत. ड्रेनेज, पाण्याबाबत काही कामे व नियोजन सुरू आहे. सध्याच्या परिस्थितीत नागरिकांच्या काही समस्या समजल्यास उपाययोजना करण्यात येतील.'

प्रसाद काटकर ,सहाय्यक आयुक्त, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय