पुणे महापालिका आयुक्तांचे ‘खड्डेदर्शन’ दीड तासात आटोपले | Road Pits | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे महापालिका आयुक्तांचे ‘खड्डेदर्शन’ दीड तासात आटोपले
पुणे महापालिका आयुक्तांचे ‘खड्डेदर्शन’ दीड तासात आटोपले

पुणे महापालिका आयुक्तांचे ‘खड्डेदर्शन’ दीड तासात आटोपले

पुणे - शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याने पुणेकरांची वाट बिकट झाली आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव आज खुद्द महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी त्यांच्या प्रशासकीय लवाजम्यासह घेतला.

ठिकठिकाणी पडलेले खड्डे, खचलेला रस्ता, तुटलेली ड्रेनेजची झाकणे, पादचारी मार्गांवर पडलेला कचरा, राडारोडा अन् आयुक्त येणार म्हणून रात्री गडबडीत केलेले निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण याची आयुक्तांनी पाहणी केली. कामे योग्य पद्धतीने होत नसल्याचे लक्षात येताच आयुक्तांनी अधिकारी, ठेकेदारांचे कान टोचून हे सर्व प्रश्‍न त्वरित मार्गी लावा, असे सांगत दीड तासात दौरा आटोपला. या रस्त्यांच्या स्थितीबाबत त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलण्यास नकार दिला.

आयुक्त विक्रम कुमार यांनी प्रभाग क्रमांक १५ मधील महात्मा फुले मंडई येथून सकाळी सव्वाआठ वाजता पाहणी दौरा सुरू केला. या वेळी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, नगरसेवक राजेश येनपुरे, नगरसेविका गायत्री खडके, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमणार, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, परिमंडल पाचचे उपायुक्त अविनाश सकपाळ, क्षेत्रीय अधिकारी आशिष महाडदळकर यासह सांडपाणी, पथ विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

दौऱ्याला सुरवात होताच मंडई येथे समान पाणीपुरवठ्याचे काम झाल्यानंतर तेथे योग्य पद्धतीने रस्ते बुजविले नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. त्याबाबत आयुक्तांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना हे काम योग्य पद्धतीने झालेले नाही, पॅचवर्क असे असते का? असे विचारले. त्यावर अधिकाऱ्यांनी ‘हे काम योग्य पद्धतीने करून घेतो साहेब’ असे आश्‍वासन दिले. यानंतर आयुक्तांनी अप्पा बळवंत चौक येथे भेट दिली. येथील अर्धवट सोडून दिलेल्या कामाची पाहणी केली. शनिवारवाड्याच्या बुरजाला लागून राडारोडा टाकण्यात आला आहे, हे आयुक्तांनी पाहिले. पटवर्धन चौकातून एच. व्ही. देसाई महाविद्यालयाच्या रस्त्याने आयुक्त चालत लाल महालापर्यंत गेले. या रस्त्याची झालेली दुरवस्था, शनिवारवाड्याच्या बाजूने पडलेले मातीचे ढिगारे, कचरा पाहून ठेकेदारांच्या अशास्त्रीय पद्धतीच्या कामाचे दर्शन आयुक्तांना झाले. येथील खड्ड्यांवर सिमेंट काँक्रिट टाकून दुरुस्त करण्यात आला. तरीही रस्त्याची लेव्हल एक नव्हती. सिमेंट काँक्रिट केलेले निघून जात असल्याचेही या वेळी आयुक्तांनी पाहिले.

शिवाजी रस्त्याची स्थिती अनुभवली

शिवाजी रस्त्यावर दत्त मंदिरापासून ते राष्ट्रभूषण चौकादरम्यान खोदकामामुळे रस्त्यांची लागलेली वाट, वाहतुकीची झाली दैना आयुक्तांनी स्वतःच पाहिली. गाडीखाना दवाखाना येथे थांबून आयुक्तांनी रस्ते खोदाई करताना व्यवस्थित बॅरिकेडिंग करून घ्या, रिसरफेसिंगची कामे नीट झाली पाहिजेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. धोंडिबा मिसाळ चौकात पाणी पुरवठ्याचे काम झाल्यानंतर मोठे दगड रस्त्यात ठेवले आहेत, त्यामुळे निर्माण झालेला अपघाताचा धोका याकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. विशेष म्हणजे सिमेंट काँक्रिट टाकल्यानंतर रस्ते खचून होणाऱ्या अपघातांचा मुद्दाही आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात आला.

हेही वाचा: पुणे : निकृष्ट बेबी केअर कीट व खेळणी साहित्याचे वाटप

नेमका खड्डा कोणाचा?

सुभाषनगर येथे पाबळकर नर्सिंग होमच्या समोर रस्ता खचलेला आहे. या ठिकाणी आयुक्त कुमार व स्थायी अध्यक्ष रासने हे पाहणी करताना ‘हे काम कोणी केले’, असे विचारले. त्या वेळी पाणी पुरवठा विभागाने ड्रेनेज विभागाचे नाव घेतले. मात्र ड्रेनेज विभागाने हे काम क्षेत्रीय कार्यालयाने केले असल्याचे सांगितले. क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी हे काम मात्र आम्ही केले नसून, ‘एमएलजीएल’ने केले आहे, असे उत्तर दिले. आयुक्तांपुढेच अधिकारी खड्ड्यांची जबाबदारी एकमेकांवर ढकलताना या वेळी दिसून आले. शेवटी खड्डा महापालिकेच्या रस्त्यावर पडला आहे, हे लक्षात घ्या आणि दुरुस्त करा, असे रासने यांनी सांगितले.

शहरातील प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली असून, महत्त्वाची ठिकाणे आयुक्तांना दाखवली आहेत. एल अँड टी कंपनीकडून पाणी पुरवठ्याचे काम झाल्यानंतर नीट रस्ते बुजविले नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पुढील दीड महिन्यात सर्व रस्ते चांगले करून घेतले जातील. त्यासाठी निधीही उपलब्ध करून दिली आहे. तसेच हे रस्ते कधी दुरुस्त होणार, याचे वेळापत्रक प्रशासनाला जाहीर करायला लावले जाईल.

- हेमंत रासने, अध्यक्ष, स्थायी समिती

दुचाकीवर नको, चालत जाऊ!

लक्ष्मी रस्त्यावर आयुक्तांनी मोटारीऐवजी दुचाकीवरून पाहणी करावी, अशी विनंती करण्यात आली. पण आयुक्तांनी चालत पाहणी करू, असे सांगितले. हुजूरपागा शाळेपासून ते उंबऱ्या गणपती चौकाच्या पुढे रांका ज्वेलर्सपर्यंत चालत पाहणी केली. आयुक्त येणार म्हणून या ठिकाणी डांबर टाकून खड्डे बुजविण्यात आले. हे काम दर्जेदार झाले नसल्याचे आयुक्तांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यावर रस्त्यावरील काम आत्ताच संपले आहे, असे सांगून अधिकाऱ्यांनी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. या दौऱ्याचा अहवाल सोमवारी सादर करा, असे आदेशही आयुक्तांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिले.

मध्यवर्ती भागातील रस्त्यांची पाहणी आयुक्तांसोबत केली आहे. या भागातील उर्वरित काम पूर्ण करून राडाराडा उचलणे, स्वच्छता करणे यासह रस्ते दुरुस्त करण्याचा कालबद्ध कार्यक्रम निश्‍चित केला जाईल. पुढील दीड महिन्यात सर्व रस्ते चांगले झाल्याचे दिसून येतील. तसेच शहराच्या इतर भागातील रस्ते दुरुस्त करण्यासाठी या प्रभागाप्रमाणे इतर भागासाठी नियोजन केले जाईल. पावसाळा संपल्याने रस्ते दुरुस्तीच्या कामाला गती येईल.

- डॉ. कुणाल खेमणार, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

loading image
go to top