स्थायी समितीच्या बैठकीला वेळेची शिस्त नाही ः निकम

स्थायी समितीच्या बैठकीला
वेळेची शिस्त नाही ः निकम
Published on: 

पुणे, ता. ५ : पुणे महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठका वेळेवर होत नसल्याने सदस्यांना नाहक ताटकळत राहावे लागत आहे. बैठकीची अधिकृत वेळ सकाळी साडेअकरा वाजताची असताना प्रत्यक्षात कामकाज दुपारी चार ते पाचनंतर सुरू होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते नीलेश निकम यांनी पत्रकार परिषदेत केला.

निकम म्हणाले, की वेळेची शिस्त पाळली जात नसून बैठक इतक्या उशिरा सुरू करणे योग्य नाही. यामुळे महिला सदस्यांना विनाकारण उशिरापर्यंत थांबावे लागते. आमचे सदस्य सकाळी वेळेत येतात, मात्र बैठक सुरू नसल्याने ते महापालिकेत अडकून पडतात, तसेच अनेक प्रस्ताव बैठक सुरू झाल्यानंतर ऐनवेळी प्रशासनाकडून दाखल केले जातात. याची पूर्वकल्पना सदस्यांना दिली जात नसल्याने त्यावर भूमिका घेता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य समितीमध्ये प्रस्तावांना विरोध करत नसल्याबाबत विचारले असता, त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली.

स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले यांनी हे आरोप फेटाळले आहेत. बैठका वेळेवर होत असल्याचे सांगत भिमाले म्हणाले की, निकम हे विरोधी पक्षनेते आहेत, आम्ही त्यांच्या सूचनांचा सन्मान करू. त्यांच्या काही अडचणी असल्यास त्यांनी सांगाव्यात. प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेतल्यानंतरच समितीमध्ये प्रस्ताव मांडले जात आहेत.