
तुळशीबागेतील व्यावसायिकांनी गेल्या तीन वर्षापासून महापालिकेचे शुल्क न भरल्याने याविरोधात आज (ता. १९) अतिक्रमण विभागाने कारवाई केली.
थकबाकीमुळे तुळशीबागेतील स्टॉल महापालिकेने केले बंद
पुणे - तुळशीबागेतील व्यावसायिकांनी गेल्या तीन वर्षापासून महापालिकेचे शुल्क न भरल्याने याविरोधात आज (ता. १९) अतिक्रमण विभागाने कारवाई केली. या ठिकाणचे सुमारे सव्वा दोनशे व्यावसायिकांना शुल्क भरल्याशिवाय दुकाने सुरू करता येणार नाहीत असे बजावले. त्यानंतर ९५ जणांनी २० ते ४० हजार रुपये रक्कम भरून दुकाने सुरू केली.
तुळशीबागेत २२१ स्टॉलधारक आहेत, गेल्या चार वर्षापासून त्यांनी महापालिकेचे शुल्क भरले नसल्याने ही थकबाकी चार कोटीच्या जवळपास गेली होती. कोरोनाच्या काळातील २२० दिवसांचे शुल्क माफ केल्याने प्रत्येकाला १ लाख ३७ हजार रुपये शुल्क भरणे आवश्यक होते. वारंवार पाठपुरावा करून देखील हे व्यावसायिक शुल्क भरण्यास टाळाटाळ करत असल्याने ही थकबाकीची रक्कम ३कोटी पेक्षा जास्त झाली आहे.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने गुरुवारी सकाळी तुळशीबागेत जाऊन थकबाकी भरल्याशिवाय दुकान चालू करता येणार नाही अशी भूमिका घेतली. त्यावेळी व्यावसायिकांनी मुदत मागितली असता प्रशासनाने तुम्ही शुल्क भरा आणि व्यवसाय सुरू करा अशी सूचना दिली. पण तरीही अनेकांनी पैसे भरण्यास नकार दिला. अखेर दुकाने बंद केल्यानंतर २२१ जणांपैकी दिवसभरात ९५ जणांनी काही प्रमाणात थकबाकी भरली. काही जणांनी २० हजार तर काही जणांनी ४० हजार रुपये रक्कम भरली आहे. उर्वरित रक्कम भरण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितली आहे, अशी माहिती उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.