
पुणे : महापालिकेच्या प्रभागरचनेवर सुनावणी घेण्यासाठी निवडणूक शाखेने वेळापत्रक जाहीर केलेले असताना त्यामध्ये प्रभाग क्रमांक २४, ३२, ३४, ३६, ५२ आणि ५८ या सहा प्रभागांचा समावेश केलेला नसल्याने त्यांची सुनावणी कधी होणार याचा संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, प्रशासनाने यावर खुलासा करताना या प्रभागांबद्दल आलेल्या हरकती या त्यांच्याशी जोडलेल्या शेजारच्या प्रभागांशी संदर्भात असल्याने त्यासोबत सुनावणी घेतली जाणार आहे असे स्पष्ट केले आहे.(Pune Municipal Corporation Election)
पुणे महापालिकेच्या निवडणुकीत ५८ प्रभाग आहेत. त्याचा प्रारूप आराखडा १ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला. त्यावर १४ फेब्रुवारीपर्यंत हरकती-सूचना नोंदविण्यात आल्या आहेत. १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतून ३ हजार ५९६ हरकती सूचना आलेल्या आहेत. या हरकती सूचनांवर सुनावणी घेण्यासाठी यशदाचे महासंचालक एस. चोकलिंगम यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याची माहिती व हरकतदारांच्या नावानुसार सुनावणीचे वेळापत्रक महापालिकेच्या www.pmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
या साडे तीन हजार हरकती- सूचना आल्या असल्या तरी यामध्ये अनेक समान हरकती सूचना आहेत. अशा समान मुद्द्यांचा एक गट तयार करून त्यांची एकत्र सुनावणी घेतली जाणार असून, १२५ गट तयार केले आहेत. २४ आणि २५ फेब्रुवारी रोजी प्रभागनिहाय सुनावणी घेतली जाणार आहे. पण यामध्ये केवळ ५२ प्रभागांचे वेळापत्रक आहे, सहा प्रभागांचा समावेश नसल्याने तेथील नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
दोन प्रभगांबद्दल शून्य हरकती
महापालिकेच्या ५८ प्रभागांपैकी सर्व प्रभागांबद्दल कमी जास्त प्रमाणात हरकती सूचना आलेल्या आहेत. पण प्रभाग क्रमांक एक व प्रभाग क्रमांक ५८ याबद्दल एकही हरकत व सूचना नोंदविली गेलेली नाही, असे निवडणूक शाखेतर्फे सांगण्यात आले.
- या प्रभागांचा वेळापत्रकात समावेश नाही
प्रभाग क्रमांक २४ - मगरपट्टा-साधना विद्यालय
प्रभाग क्रमांक ३२ - भुसारी कॉलनी-सुतारदरा
प्रभाग क्रमांक ३४ - वारजे-कोंढवेधावडे
प्रभाग क्रमांक ३६ - कर्वेनगर
प्रभाग क्रमांक ५२ - नांदेडसिटी-सनसिटी
प्रभाग क्रमांक ५८ - कात्रज-गोकुळनगर
‘‘सुनावणीच्या वेळापत्रकात ज्या प्रभागांचा समावेश नाही, अशा प्रभागांबद्दलच्या हरकती सूचना या शेजारच्या प्रभागाच्या सीमांशी संबंधित आहेत. त्यामुळे त्यावर स्वतंत्र सुनावणी घेतली जाणार नाही. त्यांच्या शेजारच्या प्रभागाच्या सुनावणीमध्ये या प्रभागांचा समावेश असेल. ज्या नागरिकांनी या सहा प्रभागांबद्दल हरकती सूचना नोंदविल्या आहेत. त्यांना पोस्टाद्वारे तसेच मोबाईलवरून मेसेज पाठवून तारीख व वेळ सांगितली जाईल. ही माहिती आॅनलाइनही उपलब्ध आहे. त्यामुळे या प्रभागांचा क्रमांक वेळापत्रकात नसला तर गोंधळून जाऊ नये.’’
- अजित देशमुख, उपायुक्त, निवडणूक शाखा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.