
तयारीला लागा; महापालिकेची अंतिम प्रभाग रचना १७ मेला जाहीर होणार
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्यासाठी कंबर कसली आहे. १७ मे रोजी पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात निवडणूक होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात पुणे महापालिकेला आदेश प्राप्त झाले आहेत. ओबीसी आरक्षणाचा तिढा आणि राज्य सरकारने निवडणुका घेण्याचे अधिकार स्वतःकडे घेतल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत उत्सुकता ताणली गेली होती.
मात्र गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे लवकरच निवडणुका होणार असे चित्र निर्माण झाले. दरम्यान पावसाळ्यात पुणे महापालिकेच्या निवडणुका पुणे शक्य नाही त्यामुळे त्या सप्टेंबर मध्ये होतील अशी चर्चा सुरू झालेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्त्यांमध्ये निवडणुका कधी होणार? हा प्रश्न अद्यापही कायम आहे. प्रभागरचनेचा प्रारूप आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला आहे. हरकती सूचनांनंतर ‘यशदा’चे महासंचालक एस. चोक्कलिंगम यांनी त्यांच्या समितीचा अहवाल निवडणूक आयोगाला सादर केला आहे यामध्ये मध्यवर्ती सह कोथरूड बाणेर बालेवाडी हडपसर यासह इतर भागात मोठ्या प्रमाणात बदल सुचविले असल्याची चर्चा आहे.
हा अहवाल दिल्यानंतरही अद्याप अंतिम प्रभाग रचना निश्चित झालेली नाही असे असताना मंगळवारी मुंबईत निवडणूक आयोगाने बैठक बोलावली होती. त्याच वेळी अंतिम प्रभाग रचना १७ मे रोजी जाहीर होणार असे आयोगाने स्पष्ट होईल.
आठवड्याभरात आरक्षण जाहीर होणार
17 मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर पुढील आठवड्याभरात निवडणूक आयोगाकडून आरक्षणाची सोडत काढली जाईल. त्याच वेळी मतदार याद्या फोडून त्यावर हरकती सूचनांची कार्यवाही पुढील १० दिवसात होऊ शकते. त्यामुळे जून मध्ये निवडणूक होऊ शकेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Web Title: Pune Municipal Corporation Election Update Final Ward Structure Of Pmc Will Announced 17th May
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..