पुणे : अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना आली पण नकाशांचा पत्ताच नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation Final ward structure notified but no maps disclosed State Election Commission
पुणे : अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना आली पण नकाशांचा पत्ताच नाही

पुणे : अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना आली पण नकाशांचा पत्ताच नाही

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने पुणे महापालिकेची अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर केली. ५८ पैकी ३२ प्रभागांच्या सीमा बदलल्या आहेत. पण प्रभागनिहाय नकाशे जाहीर न केल्याने इच्छुकांचा व कार्यकर्त्यांचा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे नेमका प्रभाग कुठून जोडला आहे, कोणता भाग तोडला आहे हे समजून घेताना डोकेदुखी वाढली आहे. गेल्या चार पाच महिन्यांपासून पुणे महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होऊ नयेत अशी भूमीका सर्वच राजकीय पक्षांनी होती, त्यामुळे निवडणूका लांबणीवर पडल्या.

प्रभाग रचनेवर आलेल्या हरकती सूचनांची सुनावणी घेऊन त्याचा अहवाल निवडणूक आयोगाला पाठविण्यात आला होता, पण आयोगाकडून त्याबाबत कोणताही निर्णय घेतला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला दोन आठवड्यात निवडणूक प्रक्रिया सुरू करा असे आदेश दिल्यानंतर अखेर प्रभाग रचना अंतिम केली. निवडणूक आयोगाने शुक्रवारी (ता. १३) रात्री उशिरा अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना जाहीर केली व संपूर्ण शहराच्या प्रभाग रचनेचा एकच नकाशा महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला. प्रभाग रचना तयार करताना नैसर्गिक हद्दींचे उल्लंघन केले आहे, ठराविक लोकांचे प्रभाग सोपे करून दिले आहेत अशी चर्चा सुरू होती. हरकती व सूचनांचा अहवाल तयार करताना समितीचे प्रमुख एस. चोकलिंगम यांनी सुमारे ९७ बदल सुचविले होते, त्यामुळे ही प्रभाग रचना मोठ्याप्रमाणात बदलणार याचे स्पष्ट संकेत मिळाले होते. त्यामुळे अंतिम प्रभाग रचनेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अधिसूचनेसोबत प्रत्येक प्रभागाचा नकाशा जाहीर होणे अपेक्षीत होते, पण निवडणूक आयोगाकडून पुणे महापालिकेला हे नकाशे पाठविण्यात आलेले नाही. त्यामुळे ते संकेतस्थळावर जाहीर केले नाही. पुढील तीन दिवस शासकीय सुट्टी असल्याने या कालावधीत नकाशे अपलोड होण्याची शक्यता नाही. केवळ अधिसूचनेवरील चर्तुसीमा वाचून प्रभागात काय बदल झाले हे स्पष्ट कळत नाही. तर संपूर्ण शहराच्या नकाशातून केवळ मोठे बदल समजत आहे. उदा. प्रभाग ३३ मधील बावधनचा भाग तोडला, प्रभाग ३२ मधील सुतारदरा प्रभाग ३० ला जोडला असे बदल समजत आहेत. पण गल्लीबोळात बदल करताना त्यातून अनेक हक्काचे मतदार दुसऱ्या प्रभागात जातात, असे सुक्ष्म बदल कळत नाहीत. त्यासाठी प्रभाग निहाय नकाशा आवश्‍यक आहेत.

‘‘निवडणूक आयोगाकडून अंतिम प्रभागाची अधिसूचना व संपूर्ण शहराचा एक नकाशा प्राप्त झाला आहे. प्रभाग निहाय नकाशे अद्याप आलेले नाहीत. ते प्राप्त होताच संकेतस्थळावर जाहीर केले जातील.’’

- यशवंत माने उपायुक्त, निवडणूक शाखा

Web Title: Pune Municipal Corporation Final Ward Structure Notified But No Maps Disclosed State Election Commission

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top